हर्षवर्धन पाटील ‘तुतारी’ फुंकणार? भाजपच्या अधिवेशनाला मारली दांडी

दौंड : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय पक्षांच्या घडामोडींना मोठा वेग आला आहे. गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील नाराज असल्याचे समजत आहे. त्यातच आता निमंत्रण देऊनही आजच्या भाजपच्या दौंडमधील जिल्हा अधिवेशनाला हर्षवर्धन पाटील यांनी दांडी मारली. यामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
दौंडमध्ये आज भाजपचं जिल्हा अधिवेशन भरवण्यात आलं होतं. या अधिवेशनाला मोठ्या संख्येनं स्थानिक पदाधिकारी आणि नेते उपस्थितीत होते. या अधिवेशनाचे हर्षवर्धन पाटील यांनाही निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र तरीदेखील हर्षवर्धन पाटील यांनी या अधिवेशनाला दांडी मारली. भाजपचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी हर्षवर्धन पाटलांना निमंत्रण दिल्याचे समोर आले आहे. या अधिवेशनाला आमदार राम शिंदे, राहुल कुल, योगेश टिळेकर हे नेते उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील ‘तुतारी’ फुंकणार?
भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊ शकतात, अशा चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू आहेत, त्यातच शरद पवार आणि हर्षवर्धन पाटील यांच्यात झालेल्या भेटीमुळे या चर्चांना आणखी उधाण आलं आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील येत्या विधानसभा निवडणुकीत तुतारी हातात घेणार का? हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





