भाजप नेते आशिष शेलारांनी मान्य केला मतदार यादीतील घोळ; पवार-ठाकरेंनी मानले आभार

मुंबई: मतदार यादीतील कथित घोळावरून मनसे आणि महाविकास आघाडीने (मविआ) निवडणूक आयोगाविरोधात काढलेल्या ‘सत्याचा मोर्चा’ आणि केलेल्या आरोपांना भारतीय जनता पक्षाचे नेते व मंत्री आशिष शेलार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. विरोधकांना केवळ ‘हिंदू दुबार मतदार’ दिसत असून, त्यांच्या मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या मुस्लिम आणि ख्रिश्चन दुबार मतदारांवर ते मौन बाळगून आहेत, असा पलटवार शेलार यांनी केला आहे.
शेलारांचा ‘दुबार मतदार’ मुद्द्यावर हल्लाबोल –
पत्रकार परिषदेत बोलताना शेलार यांनी मविआकडून ‘ठरवून फेक नरेटिव्ह’ तयार केला जात असल्याचा आरोप केला. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात 5 हजार 532 मुस्लिम दुबार मतदार असून, ते स्वतः अवघ्या 1 ते दीड हजार मतांनी निवडून आले आहेत. तसेच, मुंब्रामध्ये 30 हजारांहून अधिक आणि नाना पटोले यांच्या साकोली मतदारसंघात 400 हून अधिक मुस्लिम दुबार मतदार असल्याचा दावा शेलार यांनी केला.
शेलार म्हणाले, “राज ठाकरे यांनी सांगितलेल्या मतदारसंघात त्यांना केवळ भोईर, पाटील अशी आडनावे दिसली, पण ‘आसमा’ दिसली नाही. त्यांच्या भूमिकेतून त्यांना केवळ मराठी माणूस आणि हिंदू दुबार मतदारच दिसले का?” ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत मविआने अनेक प्रामाणिक मतदारांची नावे वगळून ‘व्होट-जिहाद’ केला. मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचे एकूण 16 लाख 84 हजार 256 दुबार मतदार असू शकतात, असेही त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे, रोहित पवार यांची प्रतिक्रिया –
शेलार यांच्या वक्तव्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपरोधिक टीका केली. शेलार यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ असल्याचे मान्य केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करत, “नकळतपणे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे ‘पप्पू’ ठरवले आहे,” असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले.
दुसरीकडे, आमदार रोहित पवार यांनीही मतदार यादीतील घोळ मान्य केल्याबद्दल शेलार यांचे आभार मानले. “आता मी उद्या मुंबईत येत असून आपण संयुक्त पत्रकार परिषदेत संयुक्तपणे ही बाब लोकांसमोर मांडू आणि एकत्रित लढू व लोकशाही वाचवू,” असे आवाहन त्यांनी शेलारांना केले.
सत्याच्या मोर्चामधील असत्यासारखं नसून व्यावहारिक आणि उघड डोळ्यांनी दिसणारं सत्य आम्ही मांडतो आहोत. मतदारांमध्ये आम्ही भेद करु इच्छित नाही पण जे करतायत त्यांना उघड करु पाहतो आहोत. गेल्या काही वर्षांपासून महाविकास आघाडी आणि आता मनसे जातीजातीतलं वितुष्ट निर्माण करण्याच्या भूमिका… pic.twitter.com/TFlwCl3GHc
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 3, 2025
मनसेकडून प्रत्युत्तर: ‘जात-धर्माचा भेद कशाला?’
शेलार यांच्या टिकेला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिले. “आमच्या दृष्टीने दुबार मतदार म्हणजे दुबार मतदारच, तो हिंदू, मुस्लिम किंवा कुठल्याही धर्माचा आणि जातीचा नाही. आशिष शेलार आमच्या मताशी सहमत झाले असतील, तर त्यांनी आमच्या सत्याच्या मोर्चात सामील व्हायला पाहिजे होते, जो निवडणूक आयोगाविरोधात होता,” असे देशपांडे म्हणाले. शेलार यांना मतदारांमध्येही जात दिसली, अशी टीकाही त्यांनी केली.
शेलार यांनी दुबार मतदारांचा मुद्दा उपस्थित केल्याने आता दुबार मतदार हा आगामी विधानसभा निवडणुकीतील एक महत्त्वाचा आणि विवादास्पद मुद्दा बनण्याची चिन्हे आहेत.




