Devendra Fadnavis | Eknath Shinde – स्थानिकच्या निवडणूका येवू घातल्या असता, राज्यातील सर्वच पक्षांनी आपपल्या तयारीला सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येकच पक्षात जोरदार इनकमिंग देखील होत असताना, राज्यातील सर्वात मोठा पक्ष असणार्या भाजपने गेल्या काही दिवसांपासून इनकमिंगवर जोर लावला. त्यांनी गतवेळच्या विधानसभा निवडणूकीत पराभूत झालेल्यांना प्रवेश दिल्यामुळे, सत्तेत असणार्या शिंदेसेनेचे आमदार वैतागले असून त्यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीवर बहिष्कार घातला. या बहिष्कारामुळे पुन्हा एकदा भाजप व शिंदेसेनेतील अंतर्गत चढाओढ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. भाजप व शिवसेना एक एकमेकांचे नैसर्गिक मित्र आहेत. मात्र, स्थानिकच्या निवडणूकांमध्ये अनेकदा विविध पक्षांचे लोक एकत्र येवून आघाडीस्वरुपात निवडणूका लढवतात. हाच धागा पकडून इतर पक्षांनी देखील एकमेकांसोबत आघाड्या करण्यास सुरुवात केली होती. मात्र, यामध्ये भाजपने नेहमीप्रमाणे आपली यंत्रणा कामाला लावताना, विरोधी पक्षातील मात्तब्बर नेत्यांना अपल्याकडे खेचण्यास सुरुवात केली. नाशिकमधून अद्वैय हिरे, सातार्यातील सत्यजीत पाटणकर, वैशाली सूर्यवंशी, वैभव पाटील यांनी शिंदेसेनेच्या विरोधात निवडणूक लढवली होती. कुठे कमी कुठे जास्त मताने, शिवसेनेचे नेते आमदार म्हणून निवडूण आले आहेत. अशा पराभूत आमदारांना थेट पक्षात घेतल्यामुळे, भाजपने ‘शत प्रतिशत’ची तयारी सुरु केली असल्याची चर्चा आहे. अशा आमदारांच्या बरोबरीने मित्रपक्षातील अनेक दमदार नेते देखील भाजपमध्ये दाखल होत आहेत. यामध्ये संभाजीनगर, कल्याण – डोंबिवली, अंबरनाथ तसेच कोकणातील काही नेत्यांचा समावेश आहे. अशा गोष्टींमुळेच भाजपच ‘दोस्तीत कुस्ती’ करत असल्याची शिंदेसेनेच्या आमदारांची आणि मंत्र्यांची भावना असल्याचे बोलले जात आहे. त्यातच शिवसेनेच्या मंत्र्यांना निधीसाठी देखील चांगलीच पळापळ करावी लागत आहे. अशा वातावरणामुळेच शिंदेसेनेच्या आमदारांनी मंगळवारी होणार्या बैठकीवर बहिष्कार टाकला. कल्याण डोंबिवलीतील प्रवेश झोंबले रवींद्र चव्हान यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद आल्यानंतर त्यांनी मुंबईसह राज्यामध्ये पक्षप्रवेशाचा झपाटा लावला. त्यात चव्हाण हे मुंबईकर असल्याने, त्यांचे मुंबईसह ठाणे, पालघर व कोकणातील पदाधिकारी व इतर पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध आहे. भाजपने चव्हानांच्या पुढाकाराने शिंदेसेनेचे कल्याण-डोंबिवलीतील काही शिवसेना पदाधिकार्यांचा मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश झाला. हा प्रवेश शिवसेनेच्या नेत्यांचा चांगलाच झोंबला. भाजपने शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याच जवळच्या नगरसेवकांना गळाला लावले, त्यामुळे शिवसेनेतील नेते चांगलेच वैतागले असल्याचे दिसून आले. याच नेत्यांनी मंत्रीमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेताना तक्रार केली. फडणवीसांकडून मंत्र्यांचीच खरडपट्टी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक आणि भरत गोगावले यांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. यावेळी त्यांनी, तुम्ही करत असलेल्या गोष्टी बरोबर नसल्याचे मंत्र्यांनी सांगितल्यानंतर, फडणवीसांनी मंत्र्यांची उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासमोरच खरडपट्टी केली. उल्हासनगरमध्ये तुम्ही देखील हेच करत आहात, असे म्हणताना मुख्यमंत्र्यांनी पुराव्यांसह मंत्र्यांना सुनावले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणत्या जिल्ह्यात कोणते प्रवेश झाले असल्याची यादीच वाचून दाखवली. तसेच मंत्रीमंडळाच्या बैठकीला अनुपस्थित असल्याबद्दल देखील फडणवीस यांनी मंत्र्यांना सुनावले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.