भाजप हा जगातील सर्वांत खोटारडा पक्ष-अखिलेश

जौनपूर – भाजप स्वत:ला जगातील सर्वांत मोठा पक्ष म्हणवतो. मात्र, भाजपने दिलेली आश्वासने आणि प्रत्यक्षात केलेले कार्य पाहता तो जगातील सर्वांत खोटारडा पक्ष आहे, असे टीकास्त्र समाजवादी पक्षाचे (सप) अध्यक्ष अखिलेश यादव यांनी बुधवारी सोडले.
केंद्रात आणि उत्तर प्रदेशात सत्तेवर असणाऱ्या भाजपने शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले. मात्र, भाजप सरकारांच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट नव्हे; तर निम्मे झाले. करोना संकटामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आला. त्यामुळे इतर राज्यांत रोजगारासाठी गेलेल्या कामगारांना उत्तर प्रदेशात परतण्यासाठी पायपीट करावी लागली.
अनेकांना जीव गमवावा लागला. त्या अवघड काळात सत्ताधाऱ्यांनी कामगारांकडे दुर्लक्ष केले. करोना संकटावेळी रुग्णांना योग्य उपचार सुविधा आणि औषधे मिळाली नाहीत. वेळीच औषधांचा आणि ऑक्सिजनचा पुरवठा झाला असता तर अनेक जीव वाचले असते, असे ते म्हणाले





