Mehbooba Mufti – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर पीडीपी अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वर्षानुवर्षे मुस्लिम आणि धर्मनिरपेक्ष लोकांना देशद्रोही ठरवणाऱ्या भाजपला आता स्वतःच्याच कर्माची फळे भोगावी लागत आहेत, असे मुफ्ती यांनी बुधवारी म्हटले. राहुल गांधींनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांना लक्ष्य करत त्यांनी देश विकण्याचे काम केले असा आरोप केला होता, ज्यावरून देशात मोठे राजकीय वादळ उठले आहे. Mehbooba Mufti : भाजप आता स्वतःच्याच कर्माची फळे भोगत आहे.! मेहबूबा मुफ्तींची खोचक टीका शोपियान येथे पत्रकारांशी बोलताना जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांनी राहुल गांधींच्या वक्तव्यावरून सुरू असलेला वाद निरर्थक असल्याचे सांगत तो फेटाळून लावला. राहुल गांधींनी असे काही म्हटले असेल, तर त्यावर एवढा गदारोळ का केला जात आहे? मुस्लिम आणि धर्मनिरपेक्ष लोकांना देशद्रोही म्हणण्याची सुरुवात स्वतः भाजपनेच केली होती, असा घणाघात मेहबूबा मुफ्ती यांनी केला. (Mehbooba Mufti) त्या पुढे म्हणाल्या, पूर्वी ते (भाजप) पाकिस्तानला जा असे म्हणायचे, आता ते इराणला जा असे म्हणत आहेत. मुस्लिमांची घरे बुलडोझर लावून पाडली गेली, तेव्हा कोणीही एक शब्द बोलले नाही. भाजपने जे पेरले आहे, तेच आता त्यांच्यासमोर येत असल्याचे सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.