चेन्नई : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (मनरेगा) योजनेंतर्गत मिळणारा केंद्रीय निधी रखडल्यावरून तमिळनाडूतील सत्तारूढ द्रमुकने आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्या राज्याचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे प्रमुख एम.के.स्टॅलिन यांनी मोदी सरकार आणि भाजपवर टीकेची झोड उठवली. भाजपला महात्मा गांधी आणि त्यांचे नाव योजनेला देणे रूचत नाही, असा शाब्दिक हल्लाबोल त्यांनी केला. मनरेगासाठीचा सुमारे ४ हजार कोटी रूपयांचा केंद्रीय निधी मिळाला नसल्याचा आरोप द्रमुकने केला आहे. तो निधी जारी करण्याच्या मागणीसाठी आणि मोदी सरकारचा निषेध करण्यासाठी द्रमुक कार्यकर्त्यांनी शनिवारी तमिळनाडूत राज्यव्यापी निदर्शने केली. त्या पार्श्वभूमीवर, स्टॅलिन यांनी सोशल मीडियावरून भूमिका मांडली. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणारी मनरेगा योजना कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील युपीए सरकारने विकसित केली. मात्र, निर्दयी भाजप ती योजनाच मोडीत काढण्यासाठी प्रयत्नशील आहे. एका स्वाक्षरीने उद्योगांची लाखोंं कोटी रूपयांची कर्जे माफ केली जातात. मग, भर उन्हात घाम गाळणाऱ्या गरिबांच्या वेतनासाठीचा निधी जारी का केला जात नाही? गरिबांसाठी पैसे नाहीत की गरिबांसाठी हृदयात स्थान नाही, असा बोचरा सवाल त्यांनी केला.