पिंपरी – भारतीय जनता पार्टी ही जगातील सर्वात अनुशासित असणारा राजकीय पक्ष असून, कोणत्याही निवडणुकीसाठी आम्ही सदैव तयार असतो. आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्येही भारतीय जनता पक्ष पूर्ण तयारीनिशी उतरणार असून, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतील. त्यासाठी तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाचा विचार आणि कल्याणकारी योजना पोहोचवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीतही भाजपा ‘अजेय’ राहील, असा विश्वास शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी व्यक्त केला.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा अंतर्गत भारतीय जनता पार्टीच्या वतीने वॉरिअर्स बैठक रहाटणी येथील थोपटे लॉन्स या ठिकाणी झाली. यावेळी पिंपरी आणि चिंचवड या दोन विधानसभा क्षेत्रातील वॉरिअर्सशी संवाद साधण्यात आला.
या बैठकीला प्रदेश महासचिव विक्रांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष अमर साबळे, बाळा भेगडे, लोकसभा निवडणूक प्रमुख तथा आमदार प्रशांत ठाकूर, प्रदेश सचिव वर्षा डहाळे, रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे, बाळासाहेब पाटील, राजेश पिल्ले, युवा मोर्च्याचे प्रदेश महामंत्री अनुप मोरे, आमदार अश्विनी जगताप, आमदार महेश लांडगे, आमदार उमा खापरे, माजी महापौर माई ढोरे, अमित गोरखे, काळूराम बारणे, रवींद्र भेगडे, शहर वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, शहर सरचिटणीस विलास मडीगेरी, नामदेव ढाके, शैला मोळक, संजय मंगोडेकर, अजय पाताडे, शीतल शिंदे, युवा मोर्च्याचे शहराध्यक्ष तुषार हिंगे, महिला मोर्च्याच्या अध्यक्षा सुजाता पालांडे, भाजपा कार्यकारिणी सदस्य संतोष कलाटे आदी उपस्थित होते.