Pimpri : नियुक्त्या लांबल्याने शहर भाजप सैरभैर

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भाजपमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून संघटनात्मक नियुक्त्या रखडल्या आहेत. महापालिका निवडणूक तोंडावर असतानाही प्रमुख पदांवरील नियुक्त्या जाहीर झालेल्या नाहीत. त्यासाठी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी आता दोन दिवसांपासून मुलाखती घेण्यास सुरूवात केली आहे. मात्र, इतक्या दिवस या नियुक्त्त्या रखडल्याने शहरातील भाजपाचे कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. तर या विलंबामागे शहरातील भोसरी आणि चिंचवड या दोन्ही गटाचे अंतर्गत राजकारण कारणीभूत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
शहर भाजपमध्ये सरचिटणीस, महिला मोर्चा, युवक मोर्चा, ओबीसी मोर्चा, व्यापारी आघाडी, सोशल मीडिया सेल आदी विविध पदांवर नियुक्त्या करणे अपेक्षित होते. अनेक इच्छुक कार्यकर्त्यांनी तयारी केली होती. मात्र, ही नावे निश्चित करताना भोसरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील आमदार आणि माजी पदाधिकाऱ्यांमध्ये वर्चस्वववादाची लढाई रंगली आहे.
शहरात भाजपकडे विधानसभेचे आणि विधानपरिषदेचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. या आमदारांचा आपापल्या गटातील कार्यकर्त्यांना पदे मिळावीत, यासाठी दबाव आहे. परिणामी, शहराध्यक्ष काटे यांना निर्णय घेताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर या नियुक्त्या लांबल्याने तयारीत असलेले कार्यकर्ते सैरभैर झाले आहेत. अनेकांनी यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती.
शहरातील आमदारांच्या दबावामुळे पदाधिकाऱ्यांच्या निवड प्रक्रिया लांबणीवर पडत आहेत. एकत्र बसून निर्णय घेण्याऐवजी प्रत्येकजण आपापल्या गटासाठी जोर लावत आहे. याचा परिणाम पक्षाच्या एकसंधतेवर होत आहे. कित्येकवेळा बैठकांचे आयोजन होऊनही नियुक्त्या लांबणीवर टाकण्यात आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तर आता कुठे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरूवात केली आहे. असे असले तरी या नियुक्त्या होण्यास उशीरच होणार असल्याचे एका पदाधिकार्याने सांगितले. गटा-तटाच्या राजकारणात नियुक्त्या रखडल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
निष्ठावंताचा विसर
आम्ही दीर्घकाळ पक्षासाठी मेहनत घेतली, निवडणुका लढवल्या, मोर्चे काढले. ज्यावेळी शहरात, राज्यात भाजपाचे काही अस्तित्व नव्हते त्या काळापासून पक्षाला वेळ दिला. मात्र, आता नियुक्त्यांसाठी आमचा विचार केला जात नाही, अशी प्रतिक्रिया काही जुन्या कार्यकर्त्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
महापालिका निवडणुकीची गणिते
या नियुक्त्यांमागे फक्त संघटनात्मक धोरण नसून, त्यातून आगामी महापालिका निवडणुकीच्या उमेदवारीची पायाभरणी होत असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोणत्या गटाला किती प्रतिनिधित्व मिळते, यावर भविष्यात उमेदवारी कुणाला मिळेल, हे ठरणार असल्याने ही रस्सीखेच अधिक तीव्र झाली आहे. काही इच्छुक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर स्वतःच्या नियुक्तीची चर्चा रंगवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गोंधळ वाढत आहे. अधिकृत घोषणेशिवाय कोणी समाजमाध्यमावर निवडीसंदर्भात पोस्ट न करण्याच्या सूचना वरिष्ठांनी दिल्या आहेत.
नियुक्त्यांची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी पक्ष कार्यालयात मुलाखती घेण्यात येत आहे. पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाईल. येत्या पंधरा दिवसांत लवकरच नवे पदाधिकारी घोषित करण्यात येतील.
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजप





