मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागल्यामुळे शिवसेनेची बरीच नाचक्की झाली आहे. तर अतिरिक्त उमेदवार निवडून आल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या गोटात उत्साह संचारला आहे. गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीतच आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी संशयाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळते आहे. दुसरीकडे भाजप ऍक्शन मोडमध्ये दिसून असून अपक्ष आमदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
येत्या 20 तारखेला होणाऱ्या विधानपरिषदेच्या 10 जागांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून 5 तर महाविकास आघाडीकडून 6 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी दोन्ही बाजूंचे प्रयत्न सुरु आहेत. भाजप नेते प्रवीण दरेकर आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी आज बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीसाठी लोकल रेल्वेने प्रवास केला. दोघेही लोकलने विरारला रवाना झाले.
हितेंद्र ठाकूर यांच्या बविआची तीन मतं आहेत. या तिन्ही मतांवर महाविकास आघाडी आणि भाजपचा डोळा आहे. त्यामुळेच दोन्ही बाजूंकडून हितेंद्र ठाकूर यांना गळ घातली जात आहे. आधी काँग्रेसकडून भाई जगताप, राष्ट्रवादीचे रामराजे नाईक निंबाळकर यांनी भेट घेतली होती.
बहुजन विकास आघाडीकडे हितेंद्र ठाकूर, क्षीतिज ठाकूर आणि राजेश पाटील अशी तीन मते आहेत. या तीन मतांसाठी हितेंद्र ठाकूर यांच्याशी भाजपची चर्चा सुरु आहे.