सोलापूर : सांगोला मतदारसंघात भाजप-शिंदे सेना यांच्यातील दरी रुंदावली आहे. शिंदे सेनेचे माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भाजपवर मोठा आरोप करत म्हटले आहे की, “गेल्या विधानसभा निवडणुकीत मला पराभूत करण्यासाठी भाजपने शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवार बाबासाहेब पाटील यांना मदत केली. लोकसभा निवडणुकीत आजारी असतानाही भाजप उमेदवाराला १५ हजार मतांचे लीड देणाऱ्या शहाजीबापूंची साथ विधानसभेला भाजपने सोडल्याचा दावा त्यांनी केला. सांगोला नगरपालिका निवडणुकीतही भाजपने आपल्या कट्टर विरोधकांना एकत्र करून मैदानात उतरवल्याने आपल्यावर अन्याय झाल्याची भावना शहाजीबापू यांनी व्यक्त केली. ही निवडणूक स्वाभिमानाची लढाई आहे. हेलिकॉप्टरने येऊन गुंडशाही करणाऱ्यांना सांगतो, पैशाच्या जोरावर तालुका विकत घेता येणार नाही. मी लढणारी औलाद आहे. महाराष्ट्र मला घाबरतो, ही कुत्री-मांजरे मला घाबरवू शकत नाहीत. सांगोल्याचे दोनच राजे – एक गणपतराव देशमुख, दुसरे शहाजीबापू पाटील. असं ते म्हणाले. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहाजीबापूंना पाठिंबा देत भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, सांगोल्याचा वाघ म्हणजे शहाजीबापू, तो जखमी शेर आहे. ३ तारखेला फटाके फोडा तयार ठेवा. सांगोल्यात फक्त आनंदा माने, बापूंना किती वेळा फसवणार? आता मात्र बापूंना कोणी फसवू शकणार नाही. बापू घाबरू नका, तुमच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे आहे, असं ते म्हणाले.