भाजपने देशभरात काश्मीरसारखी स्थिती निर्माण केली-मेहबुबा

श्रीनगर : देशाच्या प्रत्येक भागात भाजपने काश्मीरसारखी स्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे काश्मिरी जनतेचे दमन पाहण्यासाठी देशाच्या इतर भागांतील नागरिकांना काश्मीरला भेट देण्याची गरज नाही, असे टीकास्त्र जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी गुरूवारी सोडले.
जम्मू-काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यात आल्यानंतर तेथील प्रमुख नेत्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची अजून सुटका करण्यात आलेली नाही. त्यामध्ये मेहबुबांचाही समावेश आहे.
प्रतिबंधात्मक कोठडीत असतानाही त्या ट्विटरच्या माध्यमातून सातत्याने भूमिका मांडत आहेत. त्यांचे ट्विटर हॅंडल त्यांच्या कन्या इल्तिजा या ऑपरेट करतात. देशाच्या विविध भागांत नागरिकत्व दुरूस्ती कायद्याविरोधात निदर्शने सुरू आहेत. त्यात सहभागी होणाऱ्या निदर्शकांवरील कारवाईचा संदर्भ देऊन मेहबुबा यांनी ताजी टिप्पणी केली आहे.





