नवी दिल्ली – दिल्ली भाजपने पुन्हा एकदा मागील आम आदमी पक्षाच्या सरकारवर हल्लाबोल केला आहे. अगोदरच्या आम आदमी पक्षाच्या सरकारने त्यांच्या कार्यकाळात मागासवर्गीय आणि दलितांसाठी बजेटची तरतूद केली होती, परंतु ती संपूर्ण रक्कम खर्च केली नाही, असा दावा भाजपने केला आहे. दिल्ली भाजप अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले, आम आदमी पार्टी आणि अरविंद केजरीवाल यांनी मोठ्या योजनांच्या नावाखाली दलित समुदाय आणि गरिबांची सतत दिशाभूल केली आहे आणि त्यांना व्होट बँक बनवले आहे. गेल्या ५ वर्षात अरविंद केजरीवाल सरकारने दलित आणि गरिबांना राजकीयदृष्ट्या आकर्षित करण्यासाठी अनेक योजना आणल्या आहेत. त्यांच्या प्रचारावर कोट्यवधी रुपये खर्च केले गेले आहेत. परंतु प्रत्यक्षात केजरीवालांकडून दलितांना फक्त विश्वासघात मिळाला आहे. सचदेवा यांनी आकडेवारीसह याची माहिती दिली आहे. सचदेवा म्हणाले की, अरविंद केजरीवाल सरकारने २०२० मध्ये जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना या नावाने दोन योजना आणल्या होत्या. पहिली जय भीम मुख्यमंत्री प्रतिभा विकास योजना दलित अनुसूचित जाती प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आली होती तर दुसरी योजना अल्पसंख्याक, मागास आणि गरीबांसाठी जाहीर करण्यात आली होती. या योजनेमुळे दलितांची फसवणूक झाल्याचा आरोप त्यांनी केला आणि २०२०-२१ मध्ये दलितांसाठी प्रतिभा योजनेसाठी ४० कोटी रुपये वाटप करण्यात आले होते परंतु केवळ १.५ कोटी रुपये खर्च झाले. तर २०२१-२२ मध्ये ५० कोटी रुपयांचे बजेट वाटप दाखवण्यात आले होते परंतु प्रत्यक्षात खर्च फक्त २.९० कोटी रुपये होता. सचदेवा यांनी आरोप केला की २०२२-२३ मध्ये केजरीवाल सरकारने दलितांप्रती केलेली फसवणूक शिगेला पोहोचली आणि दलित प्रतिभा योजनेच्या बजेटमध्ये ७० कोटी रुपये वाटप करण्यात आले परंतु एक पैसाही खर्च करण्यात आला नाही.