प्रभात वृत्तसेवा पिंपरी – भारतीय जनता पार्टी (भाजप) च्या वतीने रविवारी (दि. २८) उमेदवारांची यादी जाहीर करण्याबाबत संकेत देण्यात आले होते. मात्र, भाजपने रविवारी रात्री उशिरापर्यत यादी जाहीर केली नाही. तर दुसरीकडे भाजप, शिवसेना युतीची देखील अद्याप घोषणा झाली नाही. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर आयारामांची एन्ट्री झाल्याने बंडखोरी टाळण्यासाठी पक्षाकडून यादी जाहीर करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे समोर येत आहे. तर अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशीच थेट उमेदवारांना एबी पत्राचे वाटप केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.महापालिका निवडणुकीसाठी अर्ज करण्यास अवघे शेवटचे दोन दिवस बाकी राहिले आहेत. मंगळवारी (दि. ३०) दुपारपर्यंतच अर्ज करण्यास मुदत देण्यात आली आहे. त्यासाठी फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. असे असतानाच शहरातील सर्वच प्रमुख पक्षांनी आपली उमेदवार यादी गुलदस्त्यात ठेवली आहे. भाजपाने प्रचारामध्ये आघाडी घेतलेली असताना उमेदवार यादी जाहीर करताना मात्र टाळाटाळ केली आहे. रविवारी यादी जाहीर होणार असल्याचे निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी जाहीर केले होते. मात्र, रविवारी देखील यादी प्रसिद्ध कऱण्यात आली नाही. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इच्छुकांची गर्दी आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या काही माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी तिकीट मिळण्याच्या आशेने भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांना देखील उमेदवारीचा शब्द भाजपाने दिला आहे. तर, दुसरीकडे एकनिष्ठांवर अन्याय होणार नसल्याचे सांगत त्यांनाही धरून राहण्याचा प्रयत्न सुरू आहे.मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोन दिवस असतानाही यादी जाहीर होत नसल्याने इच्छुक संभ्रमांत पडले आहेत. तर यामागे भाजपने राजकीय खेळी खेळली असून बंडखोरी टाळण्यासाठीच यादी लांबविल्याचे समजले आहे. आताच यादी जाहीर केली तर ज्यांना तिकीट मिळणार नाही, त्यांच्यासाठी इतर पक्षांचे दरवाजे उघडे असणार आहे. त्यामुळे भाजपाने थेट अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांना एबी फॉर्म देणयाचा निर्णय घेतला आहे. त्यापूर्वी पक्षातील सर्वच इच्छुकांना पक्षश्रेष्ठींनी अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. माघार पत्र तयार? भाजपाने शहरातील साडे आठशेहून अधिक इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. त्यावेळी त्यांना तुम्हालाच तिकीट मिळेल असे आश्वासन देत तयारी करण्यास सांगितले आहे. मात्र, राजकीय डाव टाकत त्याचवेळी काही जणांकडून माघार घेण्याबाबतचे अर्ज घेण्यात आल्याच्या चर्चा आहेत. त्यामुळे ज्यांचे नाव यादीत फायनल असेल अशाच उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येईल. तर ज्यांचा पत्ता कट करायचा आहे, त्यांचे माघार घेण्याबाबत अर्ज आधीच पक्षाकडे असणार आहेत.