राजधानी दिल्लीत भाजप आणि आप चे नगरसेवक एकमेकांना भिडले; शपथविधी सुरु असताना मोठा गदारोळ

नवी दिल्ली – दिल्ली महापालिकेच्या महापौरपदाची व उपमहापौर पदाची आज होणारी निवडणूक महापालिका सभागृहात झालेल्या गदारोळामुळे पुढे ढकलण्यात आली आहे. या सभेत पहिल्यांदा नवनिर्वाचित नगरसेवकांचा शपथविधी होणे गरजेचे असताना भाजपच्या पीठासीन अधिकाऱ्यांनी दहा नामनिर्देशित नगरसवेकांना पहिल्यांदा शपथ देण्याचा निर्णय घेतल्याने त्याला आम आदमी पक्षाच्या नगरसेवकांनी विरोध केला. त्यातून भाजप आणि आप चे नगरसेवक एकमेकांना भिडले आणि त्यामुळे आजचे कामकाज तहकुब करण्यात आले.
आता महापौर आणि उपमहापौरांची निवड नेमकी कधी होणार याची तारीख अद्याप निश्चीत करण्यात आलेली नाही.
या निवडणुकीत भाजप व उपराज्यपालांकडून जाणिवपुर्वक गोंधळाला प्रोत्साहन दिले गेले आणि त्यातून ही निवडणूक पुढे ढकलण्यात आली असा आरोप आम आदमी पक्षाकडून करण्यात आला. भाजप नगरसेवकांनी अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
एमसीडीच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे शर्मा यांना पीठासीन अधिकारी म्हणून शपथ दिल्यानंतर बैठकीला सुरुवात झाली.
त्यांनी सदस्यांचा शपथविधी पुकारला. आणि त्यासाठी उपराज्यपालांनी नियुक्ती केलेल्या सदस्यांना प्रथम पाचारण केल्याने गोंधळाला सुरूवात झाली. गदारोळात शपथविधी थांबवण्यात आला आणि पीठासीन अधिकाऱ्यांसह ‘आप’चे नगरसेवक टेबलावर उभे राहिल्याने सभा विस्कळीत झाली. भाजपचे नगरसेवकही आजूबाजूला जमले आणि त्यांनी आपच्या नगरसेवकांशी हुज्जत घातली. या साऱ्या घडामोडीत आजची महापौर व उपमहापौर पदाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
या महापालिकेत आम आदमी पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 250 नगरसेवकांच्या सभागृहात आम आदमी पक्षाला 134 जागा मिळाल्या असून भाजपला 104 जागा मिळाल्या आहेत. कॉंग्रेसला 9 जागा मिळाल्या आहेत परंतु त्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार घातला आहे.





