दूध दरासाठी भाजप आक्रमक

भोरच्या तहसीलदारांना दूध पिशव्यांसह निवेदन
भोर (प्रतिनिधी) – सध्या लॉकडाऊनच्या कालावधीत दूध उत्पादकांच्या दुधाला कवडीमोल बाजारभाव मिळत आहे. शासनाने दुधाला प्रतिलिटर 10 रुपये आणि भुकटीला 50 रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी केली रासप, भाजप व रिपाइं कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे भोर तहसीलदारांकडे केली आहे. तसेच मागण्या मान्य न झाल्यास 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन केले जाईल, असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
भोर तालुका रासपचे अध्यक्ष मारुती गोरे, विष्णू ढेबे, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष गणेश निगडे, जिल्हा सरचिटणीस समीर वाकणकर, ननावरे व इतर कार्यकर्त्यांनी भोर तहसीलदारांना हे निवेदन दिले. राज्यात 1 कोटी 40 हजार लिटर गायीचे दूध उत्पादित केले जाते. यातील 35 लाख लिटर दूध सहकारी संस्था, 10 लाख लिटर खासगी संस्था, डेअरीच्या माध्यमातून विकत घेतात. 15 लाख लिटर दूध स्वतः हॉटेल, चहा टपऱ्या व खासगी ग्राहकांना विक्री करतात.
लॉकडाऊनच्या काळात दुधाच्या विक्रीमध्ये 30 टक्के घट झाली असून सर्व पुरक व्यवसाय बंद असल्याने दुधाची मागणी घटली आहे. त्यामुळे रासप, भाजप व रिपाइंची ही मागणी आहे. मुख्यमंत्र्यांनी आम्ही पाठवत असलेल्या दुधाचा आदर करून आमच्या मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा 1 ऑगस्ट रोजी राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात
आला आहे.
“दुधाला 10 तर पावडरीला 50 रुपये अनुदान द्या’
जुन्नर (वार्ताहर) –गायीच्या दुधाला प्रति लिटर 10 व दूध पावडरला प्रति किलो 50 रुपये अनुदान मिळावे या मागणीसाठी जुन्नर तालुका भाजपच्या वतीने तहसीलदार सचिन मुंढे यांना नवेदन देण्यात आले.
यावेळी तालुकाध्यक्ष संतोष तांबे, सरचिटणीस मयूर तुळे, भाजप युवा मोर्चा जुन्नर तालुका अध्यक्ष प्रतीक जाधव, उपाध्यक्ष दीपक सरजीने, सरचिटणीस उमेश साळी, हरिश भवाळकर, जुन्नर शहराध्यक्ष गणेश बुट्टे पाटील, कार्याध्यक्ष अंबर परदेशी, शंकर कुमकर, चंद्रकांत गायकवाड, मनू आहेर, दीपक डोंगरे, ऍड. चौधरी कार्यकर्ते उपस्थित होते. या निवेदनानुसार बोगस बियाणे, दुबार पेरणीचे संकट, फसवी कर्जमाफी या सर्वांमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.





