बिबवेवाडी : भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पुणे शहरातील पुण्यनगरी परिसरात जोरदार प्रचार मोहीम राबविण्यात आली. या प्रचार मोहिमेत राजेंद्र आबा शिळीमकर, मानसी मनोज देशपांडे, महेंद्र माणिकचंद सुंदेचा (मुथा) आणि तन्वी प्रशांत दिवेकर यांनी सक्रिय सहभाग घेत नागरिकांशी थेट संवाद साधत महायुतीच्या उमेदवारांच्या बाजूने वातावरण निर्मिती केली. या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पुण्यनगरीतील भीमदीप वसाहत, तुळशीनगर आणि नवमित्र सोसायटी परिसरात घरोघरी भेटी देत मतदारांशी संवाद साधला. या वेळी भारतीय जनता पक्ष व महायुतीने आजवर राबविलेल्या विकासात्मक कामांची माहिती देत आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या योजना, नागरी सुविधा, पायाभूत विकास, महिला व युवकांसाठीच्या योजना याबाबत नागरिकांना अवगत करण्यात आले. प्रचारादरम्यान नागरिकांनी आपल्या परिसरातील विविध समस्या मांडल्या. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, वाहतूक, सार्वजनिक सुरक्षेसह इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या अपेक्षा व्यक्त केल्या. या सर्व समस्यांची दखल घेत योग्य तो पाठपुरावा करून त्या सोडविण्याचा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. “जनतेशी थेट संवाद हाच लोकशाहीचा खरा आधार आहे,” असे मत यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले. या प्रचार मोहिमेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक नागरिकांनी भाजप-महायुतीच्या उमेदवारांवर विश्वास व्यक्त करत आगामी निवडणुकीत त्यांना पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह दिसून आला. या संपूर्ण प्रचार मोहिमेचा समारोप पुण्यनगरीतील भीमदीप वसाहत, तुळशीनगर येथील नवमित्र सोसायटीमध्ये करण्यात आला. समारोपप्रसंगी कार्यकर्त्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले. आगामी निवडणुकीत पुण्यनगरी परिसरातून महायुतीला भक्कम पाठिंबा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, भाजप-महायुतीच्या प्रचाराला नवे बळ मिळाल्याचे दिसून येत आहे.