आगरताळा : त्रिपुरा विधानसभेचे सभापती बिस्व बंधू सेन यांचे शुक्रवारी बंगळूर येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. सेन ७२ वर्षांचे होते. ते उत्तर त्रिपुरातील धर्मनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. मोठा सेरेब्रल स्ट्रोक आल्यानंतर सेन यांच्यावर या दक्षिण बंगळूरमधील रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्षांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आणि त्रिपुराच्या प्रगतीला चालना देण्यासाठी सेन यांनी केलेल्या प्रयत्नांची आठवण करून दिली. सेन यांचे पार्थिव शनिवारी त्रिपुरामध्ये आणले जाईल. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. सहा म्हणाले की, मला खूप धक्का बसला आहे. सभापतींचे निधन हा पक्षाचे कधीही भरून न निघणारे नुकसान आहे. मी शोकाकुल कुटुंब आणि त्यांच्या अनुयायांप्रति माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो. त्रिपुरा विधानसभेचे सभापती बिस्व बंधू सेन जी यांच्या निधनाने दुःख झाले. त्रिपुराच्या प्रगतीला चालना देण्यासाठी आणि अनेक सामाजिक कार्यांप्रति असलेल्या त्यांच्या वचनबद्धतेसाठी त्यांना स्मरणात ठेवले जाईल. या दुःखद प्रसंगी माझ्या संवेदना त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि चाहत्यांसोबत आहेत, असे पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे.