ISI चिन्हाचा गैरवापर करणाऱ्या कंपनीवर छापा

मुंबई – मुंबई येथील इखड अर्थात भारतीय मानक ब्यूरोने 9 सप्टेंबर रोजी ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे बाटलीबंद पेयजलावर आयएसआय चिन्हाचा गैरवापर तपासण्यासाठी सक्तीचे छापे आणि जप्तीची कारवाई केली. मेसर्स मदर बेव्हरेजेस कंपनीच्या आवारात टाकलेल्या छाप्यात भारतीय मानक ब्युरोच्या “आयएसआय’ मार्कचा गैरवापर आढळला.
मेसर्स मदर बेव्हरेजेस, वैध परवान्याशिवाय आणि विविध परवाना क्रमांक वापरून झिप ऍक्वा, ऑक्सि क्लिअर, रिहा, झेफ ऍक्वा, ऑक्सिरिओ या ब्रॅंडचे सीलबंद पेयजल “आयएसआय’ चिन्हाचा गैरवापर करून विकत असल्याचे आढळले.
या छाप्यात भारतीय मानक 14543: 2016 नुसार 1 लीटरच्या सुमारे 360 बाटल्या आणि 500 मिलीलिटरच्या 852 बाटल्या तसेच विविध प्रकारचे लेबल,स्टिकर्स जप्त करण्यात आली. बीआयएस मुंबईच्या अधिकाऱ्यांच्या पथकात अर्जुन.टी आणि निशिकांत सिंह या क वर्गाच्या शास्त्रज्ञांचा समावेश होता.
भारतीय मानक ब्यूरो कायदा 2016 नुसार भारतीय मानक ब्यूरोच्या मानक चिन्हांचा गैरवापर केल्यास दोन वर्षांपर्यंत कारावास किंवा किमान 2 लाख रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकतो. या गुन्ह्यासाठी न्यायालयात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.



