Pimpri : दुर्गा टेकडीच्या सौंदर्यात भर घालणारे वाढदिवस

निगडी : निगडी परिसरातील दुर्गा टेकडीवरील जैवविविधतेत भर घालण्यासाठी महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबविले जात आहेत. वाढदिवसानिमित्त फळझाडाचे रोपण करण्याच्या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.
दुर्गा टेकडीवर दररोज फिरायला अणि व्यायामासाठी येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. हजारो झाडांमुळे हा परिसर देखणा झाला आहे. महापालिकेकडून या टेकडीवर १९७२ मध्ये पहिल्यांदा वृक्षारोपण करण्यात आले, त्यानंतर टप्प्याटप्प्याने टेकडी फुलवण्यात आली. सुमारे ८५ एकर परिसरात टेकडी पसरलेली आहे.
या ठिकाणच्या झाडांना पाणी देण्यासाठी कृत्रिम पाणवठे करण्यात आले आहेत. पक्ष्यांसाठी ठिकविकाणी ‘बर्ड फीडर’ ठेवले आहेत. टेकडीवरील देवीच्या मंदिराच्या बाजूला असलेल्या तळ्यातही पावसाचे पाणी साठवले जाते,परिसरात अनेक औषधी झाडे आहेत. मात्र, टेकडीवर आढळणारे पशु, पक्षी पाहता फळांची झाडे वाढवण्यावर पालिकेने भर दिला आहे.
सफरचंदाचे रोपण यशस्वी
टेकडीवरील रिकाम्या असलेल्या जागेत फळझाडांचे रोपण केले जात आहे. येथील काही परिसर खडकाळ असूनही त्या ठिकाणी फळझाडांचे यशस्वी रोपण झाले आहे. त्याचबरोबर आंबा, चिंच, आवळा, लिंबू, डाळिंब, चिकू, सफरचंद, सीताफळ, रामफळाची रोपे देखील लावली आहेत.
८५ एकर दुर्गा टेकडीचा परिसर असून रोज आठ ते दहा हजार नागरिक येथे फिरायला येतात. या टेकडीवर ३२ प्रकारचे पक्षी असून त्यांचा अधिवास अधिक मजबूत करण्यासाठी येथील जैव विविधता सक्षम करणे गरजेचे आहे. या दृष्टीकोणातून येथे फिरायला येणाऱ्या नागरिकांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी रोप लावायचे आणि त्याचे संगोपन करण्याचा संकल्प घेतला. यामुळे हा परिसर अधिकच सुंदर आणि निसर्गरम्य झाला आहे.
दुर्गा टेकडी परिसरातील पक्ष्यांना खाद्य मिळाल्यास ते स्थिरावतील हा विचार आला आणि या उपक्रमाची सुरुवात झाली. येथे फिरायला येणाऱ्या सदस्यांच्या वाढदिवसाने या उपक्रमाची सुरुवात ६१ झाडांचे रोपण करून करण्यात आली. नागरिकांनी रोपण केलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
– अशोक वायकर, उद्यान कर्मचारी, दुर्गा टेकड़ीआमचा जय हरी नावाचा ग्रुप आहे यात २५ ते ३० सदस्य आहेत. वाढदिवसाचे औचित्य साधून आम्ही आतापर्यंत आंबा, लिंब, आवळा, चिकू अशी फळझाडे लावली आहेत.
-संतोष मुंगसे, नागरिक





