Rahul Gandhi: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महिला आरक्षण अंमलबजावणीसाठी मांडण्यात आलेल्या विधेयकांवर जोरदार टीका करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. लोकसभेत चर्चेदरम्यान त्यांनी म्हटले की, हे विधेयक महिलांच्या सक्षमीकरणाशी संबंधित नसून देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न आहे. लोकसभेत महिलांसाठी २०२९ च्या सार्वत्रिक निवडणुकांपासून आरक्षण लागू करण्याच्या उद्देशाने मांडण्यात आलेल्या तीन विधेयकांवर चर्चा सुरू आहे. यात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाचाही समावेश आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर तीव्र टीका केली. “हे महिला आरक्षण विधेयक नाही. याचा महिलांच्या सक्षमीकरणाशी काहीही संबंध नाही. हा देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न आहे. हे लज्जास्पद आहे,” असे ते म्हणाले. Rahul Gandhi ओबीसी समाजाला दूर ठेवण्याचा प्रयत्न – (Rahul Gandhi) यावेळी त्यांनी जातीय जनगणनेचा मुद्दाही उपस्थित केला. “या प्रक्रियेद्वारे जातीय जनगणनेला बायपास करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व देण्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. संसद आणि विधानसभांमधील प्रतिनिधित्वासाठी जातीय जनगणना वापरली जाऊ नये, यासाठीच हा प्रयत्न आहे. त्यामुळे हा मुद्दा पुढील दहा वर्षांसाठी लांबणीवर टाकला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. Rahul Gandhi: “देशाचा निवडणूक नकाशा बदलण्याचा प्रयत्न”; लोकसभेत राहुल गांधींचा हल्लाबोल राहुल गांधी यांनी पुढे सांगितले की, विरोधक हे तीनही विधेयके मंजूर होऊ देणार नाहीत. “महिला आरक्षण लागू करणे सोपे आहे. जुनं विधेयक तात्काळ आणा, आम्ही त्याला लगेच पाठिंबा देऊ. तेच खरं महिला आरक्षण विधेयक आहे. हे काहीतरी वेगळंच आहे,” असे ते म्हणाले. लहान राज्यांचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा प्रयत्न – (Rahul Gandhi) तसेच त्यांनी भाजप-नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर सत्तेत राहण्यासाठी देशाचा राजकीय नकाशा बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला. “देशातील राजकारणात आपली ताकद कमी होत असल्याची भीती तुम्हाला वाटते. त्यामुळे तुम्ही संपूर्ण राजकीय नकाशा बदलण्याचा प्रयत्न करत आहात. जम्मू-काश्मीर आणि आसाममध्ये हे आधीच केले आहे आणि आता संपूर्ण देशात तेच करण्याचा विचार आहे,” असा आरोप त्यांनी केला. दक्षिण भारत, ईशान्येकडील आणि लहान राज्यांचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “भाजप सत्तेत राहण्यासाठी या राज्यांचे प्रतिनिधित्व कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. हा राष्ट्रविरोधी प्रकार आहे. कोणत्याही परिस्थितीत आम्ही हे होऊ देणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.