वॉशिंग्टन – जगात करोनाचा प्रवेश होऊन उणेपुरे एक वर्ष लोटले तरी अजूनही जगातील काही भागांत त्याचा प्रकोप वाढतच आहे. करोना महामारीविषयी कधी आशादायी बातमी येते तर कधी निराशादायक बातमी येत आहे. अशात जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिल गेट्स यांनीही करोनाबाबत एक भविष्यवाणी केली आहे.
करोनाचा प्रादुर्भाव पाहता जगभरात लसनिर्मिती वेगाने सुरू आहे. तर एक-दोन देशात लस देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र तरी करोनाचा प्रकोप थांबायला तयार नाही. अशातच मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनी करोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढणार असल्याचे भाकीत केले आहे. येत्या 4 ते 6 महिन्यांमध्ये करोनामुळे परिस्थिती आणखी चिंताजनक होणार असल्याचे बिल गेट्स यांनी एका मुलाखती दरम्यान सांगितले आहे.
‘बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन’ ही बिल गेट्स यांची संस्था सध्या करोनाविरोधी लस बनवण्यात आणि जगभर वितरीत करण्यासाठी प्रयत्न करीत आहे.
आयएचएमआयच्या अंदाजानुसार या काळात दोन लाखांपेक्षा अधिक मृत्यू करोना विषाणूमुळे होऊ शकतो, अशी माहिती बिल गेट्स यांनी यावेळी दिली. अमेरिकेतही करोनाचा हाहाकार अद्यापही थांबायला तयार नाही. त्यामुळे चिंतेचे वातावरण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.