उर्से, (वार्ताहर) – पुणे मुंबई द्रुतगती मार्गालगत सेवा रस्ता नाही. त्यामुळे अनेक दुचाकीस्वार जोखिम पत्करून द्रुतगती मार्गावरून प्रवास करतात. या मार्गावरून तुफान वेगात धावणाऱ्या वाहनांमुळे दुचाकीला अपघात होण्याची शक्यता नाकारतायेत नाही. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाने तातडीने सेवारस्ता करावा, अशी मागणी द्रुतगती मार्गालगतच्या गावांमधून होत आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दुचाकी वाहनांना प्रवेश नाही. दुचाकीस्वारांनी प्रवेश करू नये, यासाठी महामार्ग पोलिसांचीही त्यांच्यावर करडी नजर असते. तरीही द्रुतगती मार्गालगतच्या गावातील अनेक नागरिक आपल्या दुचाकीवरून महामार्ग पोलिसांची नजर चुकवून किंवा पोलीस चौकीपासून दूर असलेल्या ठिकाणाहून द्रुतगती मार्गाला प्रवेश करून पुढील प्रवास द्रुतगती मागनि करतात. अशा दुचाकीस्वारांची संख्या वाढली आहे. यापूर्वी द्रुतगती मार्गावर अनेक दुचाकीस्वारांचे अपघात झाले आहेत. तरीही द्रुतगती मार्गावरील त्यांचा प्रवास सुरुच आहे. त्यातून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. द्रुतगती मार्गालगतच्या गावासाठी सेवा रस्ता नसल्याने दुचाकीस्वारांना द्रुतगती मार्गावरून प्रवास करावा लागतो. हा प्रवास टाळण्यासाठी रस्ते विकास महामंडळाने तातडीने सेवा रस्ता करावा, अशी मागणी द्रुतगती मार्गालगतच्या गावांची आहे. कालबाह्य दुचाकींचा वापर रस्ते विकास महामंडळाने वाहनचालकांवर नजर ठेवण्यासाठी व दंडात्मक कारवाई करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत, याचीही भीती दुचाकीस्वारांमध्ये दिसत नाही. कारण, अनेकांच्या दुचाकी कालबाह्य झाल्या असल्याने त्यांनी दुचाकीवरचा वाहन क्रमांकही गायब केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे पोलिसांना कठीण झाले आहे.