पिंपरी | खोपोली शहरात नगरपरिषदेकडून बाइक रॅली

खालापूर, (वार्ताहर) – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून ‘हर घर तिरंगा’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांत ही मोहीम एक लोक चळवळ बनली आहे. राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात हर घर तिरंगा अभियान राबविले जाते.
यंदाही महाराष्ट्र शासनाने अभियान यशस्वी करण्यासाठी ‘घरोघरी तिरंगा मोहीम’ सुरू केली आहे. यापार्श्वभूमीवर खोपोली नगर परिषदेकडून अभियानाबाबत शहरात जनजागृती करण्यासाठी बाइक रॅली काढण्यात आली.
क्रांतीदिनाचे औचित्य साधून शुक्रवारी सकाळी शहरातून ही विशेष बाइक रॅली काढण्यात आली. खोपोली नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीमध्ये उपमुख्याधिकारी गौतम भगळे, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. यावेळी ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट या कालावधीत आपल्या घरावर, इमारतीवर राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नागरिकांना आवाहन करण्यात आले.





