Biju Janata Dal : बिजू जनता दलाने ठोठावला निवडणूक आयोगाचा दरवाजा; मतदान आकडेवारीत तफावत असल्याची केली तक्रार

नवी दिल्ली : बिजू जनता दलाने (बिजद) सोमवारी निवडणूक आयोगाचा दरवाजा ठोठावला. त्या पक्षाने ओडिशातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील मतदान आकडेवारीत तफावत असल्याची तक्रार केली आहे. ओडिशात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्या. त्या निवडणुकांनी माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बिजदला प्रचंड राजकीय हादरा दिला.
भाजपने बिजदला पराभूत करत त्या राज्याची सत्ता काबीज केली. त्याशिवाय, बिजद लोकसभेची एकही जागा जिंकू शकला नाही. आता त्या पक्षाने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. मतदान समाप्त झाल्यानंतर जारी करण्यात आलेली टक्केवारी आणि त्यानंतर दोन दिवसांनी जाहीर करण्यात आलेली अंतिम टक्केवारीमध्ये मोठे अंतर आहे.
लोकसभा आणि विधानसभा जागांसाठी एकाच वेळी मतदान झाले. मात्र, त्यासाठी एकाच ठिकाणी झालेल्या मतदानाच्या प्रमाणातही फरक असल्याचा दावा त्या पक्षाने केला. देशातील निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता वाढावी या उद्देशातून आयोगाकडे तक्रार दाखल केल्याचे बिजदने म्हटले. तो पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा किंवा विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा घटक नाही. स्वतंत्रपणे राजकीय वाटचाल करण्याचे धोरण त्या पक्षाने कायम ठेवले आहे.





