Raid On DTO Home: जिल्हा परिवहन अधिकाऱ्याच्या घरावर छापा; सोन्या-चांदीचे दागिने पाहून अधिकारी हादरले

Raid On DTO Home: बिहारमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याआधी अप्रामाणिक आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. भ्रष्टाचाराविरुद्ध मोठी कारवाई करत, विशेष दक्षता युनिट (SVU) पथकाने शुक्रवारी (7 मार्च) नालंदा जिल्हा परिवहन अधिकारी (DTO) अनिल कुमार दास यांच्या ठिकाणांवर छापा टाकला. उत्पन्नाच्या प्रमाणापेक्षा जास्त मालमत्ता मिळवल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. डीटीओच्या घरातून अधिकाऱ्यांनी अनेक महागड्या वस्तू जप्त केल्या आहेत. सोन्या-चांदीचे दागिने पाहून तर अधिकाऱ्यांना धक्काच बसला.
शुक्रवारी सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान दोन दक्षता वाहने अचानक बिहार शरीफ येथील डीटीओच्या भाड्याच्या फ्लॅटवर पोहोचली. डीएसपी चंद्रभूषण सिंग यांच्या नेतृत्वाखाली सहा सदस्यीय पथकाने फ्लॅटला आतून कुलूप लावून छापेमारी सुरू केली. वृत्तांनुसार, 94 लाख रुपयांच्या बेहिशोबी मालमत्तेचे प्रकरण समोर आल्यानंतर स्पेशल युनिट टीमने डीटीओविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
शोध मोहिमेदरम्यान, दक्षता पथकाने अधिकाऱ्याच्या घरातून महागडे दागिने आणि इतर वस्तू जप्त केल्या. दास यांच्या भाड्याच्या घरावर छापा टाकण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सकाळी सहा वाजतापासून अधिकाऱ्यांचे पथक कारवाई करत होते.
डीटीओ अनिल कुमार दास यांच्या घरावर सायंकाळपर्यंत छापेमारी सुरू होती. मीडियाला आत प्रवेश दिला जात नव्हता. दक्षता पथकाच्या अधिकाऱ्यांनी कागदपत्रांची तपासणी केली. अनिल कुमार दास हे मूळचे जमुई जिल्ह्यातील आहेत. नालंदा डीटीओचे पद स्वीकारण्यापूर्वी अनिल कुमार दास मुझफ्फरपूरमध्ये उपविभागीय अधिकारी (एसडीओ) म्हणून कार्यरत होते.
विशेष दक्षता युनिटच्या सूत्रांनुसार, नालंदा व्यतिरिक्त, भ्रष्ट डीटीओच्या विरोधात त्याच्या पाटण्यातील निवासस्थानी देखील शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विशेष दक्षता युनिटच्या पथकाने नालंदा जिल्ह्यातील स्थानिक पोलिस स्टेशनच्या सहकार्याने जिल्हा परिवहन अधिकारी अनिल कपूर दास यांच्या ठिकाणांवर छापा टाकला.
मिळालेल्या माहितीनुसार, 94 लाखांपेक्षा जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याआधी नुकतेच विशेष दक्षता युनिटच्या पथकाने बेतिया येथील जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांच्या घरीही छापा टाकून बेकायदा मालमत्ता उघडकीस आणली होती. शुक्रवारी पुन्हा एकदा विशेष दक्षता युनिटच्या कारवाईने भ्रष्ट अधिकाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.





