बिहारमधील जुमई येथे झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मृतांमध्ये सहा जणांपैकी पाच जण दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे नातेवाईक होते. हे सर्व लोक अंत्यसंस्कार करून पाटण्याहून घरी परतत होते यादरम्यान ट्रक आणि कारची धडक होऊन सहा जणांचा मृत्यू झाला. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुशांतच्या पाच नातेवाईकांचा रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे. त्यात हरियाणातील एडीजीपी ओपी सिंह यांचे मेहुणे, दोन पुतणे आणि अन्य दोन नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात हलसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिकंदरा-शेखपूर मुख्य रस्त्यावर असलेल्या पिपरा गावाजवळ सकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
जुमईच्या खैरा ब्लॉकच्या नौदिहा येथील काही लोक अंत्यसंस्कारासाठी पाटण्याला गेले होते. अंत्यसंस्कार करून परतत असताना पिपरा गावाजवळ त्यांची कार एका ट्रकला धडकली. यावेळी दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी जोरदार होती की, यामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. मृत आणि जखमींची ओळख पटल्यानंतर नातेवाईकांना कळवण्यात आल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले आहे.