Bihar Politics : जनसुराज पक्षाच्या अध्यक्षपदी उदय सिंह यांची नियुक्ती

पाटणा : बिहारमधील राजकीय रणसंग्रामासाठी सज्ज झालेल्या जनसुराज पक्षाने सोमवारी पहिल्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड केली. भाजपला रामराम ठोकून आलेले माजी खासदार उदय सिंह यांना तो मान मिळाला. त्यामुळे त्या पक्षाचे संस्थापक प्रशांत किशोर रिमोट कंट्रोलची भूमिका निभावणार असल्याचे स्पष्ट झाले. निवडणूक रणनीतीकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किशोर यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला.
त्यातून त्यांनी मागील वर्षी जनसुराज पक्षाची स्थापना केली. मात्र, अध्यक्षाविनाच त्या पक्षाचे कामकाज सुरू होते. पक्षाचे कुठले पद स्वीकारणार नसल्याचे किशोर यांनी याआधीच जाहीर केले होते. त्या भूमिकेवर ठाम राहत त्यांनी पक्षाच्या पहिल्या राष्ट्रीय अध्यक्षाच्या निवडीची घोषणा केली. इतर पक्षांतून आलेल्या नेत्यांचाही किशोर यांच्या पक्षात सन्मान केला जाणार असल्याचे ७२ वर्षीय सिंह यांच्या निवडीतून सूचित झाले.
सिंह दोनवेळा भाजपच्या तिकिटावर खासदार बनले. ते बिहारच्या पूर्णियामधून २००४ आणि २००९ यावर्षी लोकसभेवर निवडून गेले. मात्र, २०१४ मधील निवडणुकीत ते पराभूत झाले. त्यानंतर ते राजकीय पटलावर काहीसे दुर्लक्षिले गेले. आता त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले आहे. बिहारमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल. आता अध्यक्षाच्या निवडीतून त्या रणसंग्रामासाठी सज्ज झाल्याचा राजकीय संदेश किशोर यांच्या पक्षाने दिला आहे.





