Bihar Election Results 2025 : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. ११ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष निवडणूक निकालांवर लागले आहे. ही मतमोजणी आज म्हणजेच शुक्रवारी, १४ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार असून, सायंकाळपर्यंत अंतिम निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. कधी सुरू होईल मतमोजणी? भारत निवडणूक आयोगाच्या (ECI) संकेतस्थळानुसार, मतमोजणीला आणि सुरुवातीच्या कलांना शुक्रवार, १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून सुरुवात होईल. मतमोजणी पूर्ण होऊन अंतिम निकाल जाहीर होण्यास संध्याकाळपर्यंतची वेळ लागण्याची शक्यता आहे. उत्साहपूर्ण मतदान आणि एक्झिट पोलचे आकडे दोन टप्प्यांत झालेल्या या निवडणुकीत मतदारांचा मोठा उत्साह दिसून आला. प्रमुख राजकीय पक्ष आणि आघाड्यांनी जोरदार प्रचार केल्यामुळे ही निवडणूक अटीतटीची मानली जात आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यात ६६.९१% इतके विक्रमी मतदान झाले, जे १९५१ नंतर बिहारमधील सर्वाधिक मतदान असल्याची नोंद निवडणूक आयोगाने केली आहे. दरम्यान, मतदान पूर्ण होताच जाहीर झालेल्या एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, एनडीए (NDA) आघाडीला बहुमतापेक्षा अधिक जागा मिळण्याचा स्पष्ट अंदाज आहे. एकूण २४३ जागा असलेल्या विधानसभेत बहुमतासाठी १२२ जागांची आवश्यकता आहे, परंतु एक्झिट पोलमध्ये एनडीएला त्याहून अधिक जागा मिळण्याचे संकेत आहेत. या उलट, राष्ट्रीय जनता दलाच्या (RJD) नेतृत्वाखालील महाआघाडीला १०० किंवा त्याहून कमी जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. निकाल कुठे पाहाल लाईव्ह? बिहार निवडणुकीच्या निकालाचे क्षणोक्षणीचे अपडेट्स, तज्ज्ञांचे विश्लेषण आणि संपूर्ण कव्हरेज इलेक्शन कमिशनच्या वेबसाइटवर तसेच विविध टीव्ही चॅनेलवर लाइव्ह पाहता येणार आहे.