Devendra Fadnavis । Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणूक २०२५ ची मतमोजणी सध्या सुरु असून, आतापर्यंतचे कल एनडीएच्या बाजूने दिसत आहेत. आतापर्यंतचे ट्रेंड्स पाहता, एनडीए २०३ जागांच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे चित्र आहे, तर महागठबंधन केवळ ३४ जागांवर आघाडीवर आहे. या विजयी आघाडीवर भाजपने देशभरात जल्लोष साजरा केला असून, विरोधकांनी मात्र जोरदार टीका केली आहे. निवडणुकीच्या ट्रेंडनुसार सर्व एनडीए पक्ष २०३ जागांवर आघाडीवर आहेत. भाजपकडे ९२ जागा, नितीश कुमार यांच्या जेडीयूकडे ८३, चिराग पासवान यांच्या एलजेपीआरकडे २१ जीतन राम मांझी यांच्या एचएएमकडे ४ आणि उपेंद्र कुशवाह यांच्या आरएलएमकडे ४ जागा आहेत. यामध्ये सर्वाधिक जागा भाजपकडे ९२ असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे आता बिहारमध्ये कोणाचा मुख्यमंत्री होणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. अश्यातच, यावर आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. बिहार विधानसभेतील एनडीएला मिळालेल्या यशाबाबत बोलताना फडणवीस म्हणाले की, ‘मी बिहारच्या जनतेचे आणि सर्व मतदारांचे आभार मानतो. बिहारने पुन्हा एकदा नितीश कुमार यांच्यावर विश्वास दाखवला आहे. चिराग पासवास, मांझी अशी आमची युती होती, त्याला चांगला प्रतिसाद जनतेले दिला. यातून जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर बिहारच्या जनतेचा असलेला विश्वास दिसून आला आहे.’ बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल ? बिहारचा मुख्यमंत्री कोण असेल यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘नितीश कुमार यांच्या नेतृत्वात ही निवडणूक झाली आहे, आता नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार हे मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतील. मला यावर बोलण्याचा अधिकार नाही, आमचे वरिष्ठ नेते यावर भाष्य करतील.’ या आधी विनोद तावडे यांनीही बिहारच्या मुख्यमंत्री पदाबाबत बोलताना वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील असं विधान केलं होतं. काँग्रेसवर साधला निशाणा… या निकालानंतर काँग्रेसवर टीका करताना फडणवीस म्हणाले की, राहुल गांधींच्या विषारी प्रचाराला बिहारच्या जनतेने उत्तर दिले आहे. ते संविधानिक संस्थांचा अपमान करत आहेत. ते अपमान थांबवत नाहीत तोपर्यंत त्यांची अवस्था अशीच असेल. काँग्रेसला आणि त्यांच्या मित्र पक्षांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. त्यांचे सर्व मुद्दे फेल ठरले आहेत. हे खोटारडे लोक आहेत, जोपर्यंत ते सत्य स्वीकारलं नाही, तर त्यांचे पतन सुरूच राहील.