पाटणा: बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या आधीच राष्ट्रीय जनता दल (RJD) पक्षाला मोठा धक्का बसला आहे. कैमूर जिल्ह्यातील मोहनिया विधानसभा मतदारसंघातून RJD उमेदवार श्वेता सुमन यांचे नामांकन रद्द करण्यात आले आहे. यामुळे महाआघाडीला निवडणूक लढण्याआधीच एका जागेवर पराभव पत्करावा लागला आहे. निवडणूक आयोगाने छाननीनंतर श्वेता सुमन यांचे नामांकन फेटाळले, कारण त्या उत्तर प्रदेशच्या मूळ रहिवासी असल्याचे आढळले. बिहारमधील आरक्षित जागेवरून निवडणूक लढण्यासाठी त्या अपात्र ठरल्या. नामांकन रद्द झाल्याने श्वेता सुमन भावूक झाल्या आणि त्यांनी पत्रकारांशी बोलताना रडून आपला संताप व्यक्त केला. त्यांनी हा निर्णय राजकीय दबावाखाली घेतल्याचा गंभीर आरोप केला. “दिल्लीतून सतत आरओ (रिटर्निंग ऑफिसर) आणि सीओ (सर्कल ऑफिसर) यांच्यावर दबाव आणला जात होता आणि त्यांना हा निर्णय घेण्यासाठी भाग पाडले गेले,” असे सुमन यांनी म्हटले आहे. भाजपला आपल्या पराभवाची भीती वाटत असल्यानेच षड्यंत्र रचून नामांकन रद्द केल्याचा त्यांचा दावा आहे. त्यांनी भाजपच्या उमेदवार संगीता यांच्यावरही निशाणा साधला, “भाजप उमेदवार संगीता यांनी अधिसूचनेच्या तारखेनंतर आपले जात प्रमाणपत्र सादर केले, पण भाजपच्या असल्याने त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.” श्वेता सुमन यांनी या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागण्याची घोषणा केली आहे. दरम्यान, मोहनिया व्यतिरिक्त, पूर्वी चंपारणच्या सुगौली मतदारसंघातून VIP (विकासशील इन्सान पार्टी) उमेदवार शशी भूषण सिंह यांचे नामांकनही चुकीमुळे रद्द झाले आहे. तसेच, जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर यांनीही भाजपच्या दबावामुळे आपल्या तीन उमेदवारांनी नामांकन मागे घेतल्याचा आरोप केला आहे. बिहार विधानसभेसाठी ६ नोव्हेंबर आणि ११ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे, तर मतमोजणी १४ नोव्हेंबरला होईल.