पटना – बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्ष (रामविलास)चे प्रमुख चिराग पासवान यांनी आज पाटण्यात आपत्कालीन बैठक बोलावली होती. या बैठकीमागे जागा वाटपावरून निर्माण झालेला तणाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिराग पासवान किमान ४० जागांवर उमेदवार उतरण्याचा विचार करत आहेत; मात्र भाजप आणि जेडीयू या मित्रपक्षांनी त्यांना २५ पेक्षा जास्त जागा देण्यास नकार दिल्याचे समजते. यामुळे चिराग यांनी दबाव वाढवण्याची भूमिका घेतली आहे. बैठकीपूर्वी चिराग पासवान यांनी सोशल मीडियावर एक अर्थपूर्ण पोस्ट करत लिहिले होते – “जुर्म करो मत, जुर्म सहो मत। जीना है तो मरना सीखो, कदम-कदम पर लड़ना सीखो।” या संदेशातून त्यांनी आपले तीव्र मनोभाव आणि आगामी पावले सूचित केल्याचे मानले जात आहे. २०२० च्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी एनडीएपासून वेगळे होऊन स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. त्या वेळी त्यांच्या पक्षाने जेडीयूला मोठा धक्का दिला होता. त्यामुळे यावेळीही ते असाच निर्णय घेतील का, हा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी चिराग पासवान यांनी भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली होती. या बैठकीत जागावाटपावर सविस्तर चर्चा झाली. काही मतदारसंघांवर भाजप, जेडीयू आणि एलजेपी (रामविलास) या तिन्ही पक्षांची दावेदारी असल्याचे सूत्रांनी सांगितले. राजकीय जाणकारांच्या मते, चिराग पासवान एनडीए गठबंधन सोडण्याचा निर्णय सध्या घेणार नाहीत. मात्र, अधिकाधिक जागा मिळवण्यासाठी ते दबावाची रणनीती वापरत आहेत. त्यांच्या बरोबरीनेच हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे नेते आणि केंद्रीय मंत्री जीतनराम मांझी हे देखील आपल्या पक्षासाठी जास्त जागा मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. बिहारमधील आगामी निवडणूक लढतीत चिराग पासवान यांच्या पुढील पावलांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.