नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी उडाली असून आज कॉंग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. 30 जणांच्या या स्टार प्रचारकांच्या यादीत महाराष्ट्रातून केवळ कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांचा समावेश करण्यात आला आहे. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेसने आज स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली. या यादीत कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, कॉंग्रेस नेते राहुल गांधी, मीरा कुमार, गुलाम नबी आझाद, प्रियांका गांधी, शक्तीसिंह गोहिल, मदन मोहन सिंग, अशोक गेहलोत, कॅप्टन अमरिंदर सिंग, भुपेश बघेल, तारिक अन्वर, रणदीपसिंह सुरजेवाला, शकील अहमद, शत्रुघ्न सिन्हा, निखिल कुमार, सचिन पायलट, प्रमोद तिवारी, अखिलेश प्रसाद सिंह, मोहम्मद जावेद, राज बब्बर, किर्ती आझाद, संजय निरुपम, उदित राज, इम्रान प्रतापग्रही, प्रेमचंद शर्मा, अनिल शर्मा, अजय कपूर आणि विरेंद्रसिंह राठोड आदी नेत्यांचा समावेश आहे. कॉंग्रेस नेते संजय निरुपम हे राज्यातील आघाडी सरकारवर सातत्याने टीका करत असतात. खासकरून शिवसेनेवर त्यांनी तिखट शब्दांत टीका केली आहे. असे असतानाही निरुपम यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. शिवाय कॉंग्रेसच्या राज्यातील एकाही माजी केंद्रीय मंत्र्याला किंवा माजी मुख्यमंत्र्याचा या यादीत समावेश नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निरुपम हे राज्यातील आघाडी सरकारवर टीका करत असले तरी पक्षातील त्यांचे स्थान आढळ असल्याचे या निमित्ताने दिसून येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.