पाच महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल आला. ‘400 पार’चा नारा देणारी भाजप अडीचशेचा आकडा गाठू शकली नाही. त्यांना तिसर्यांदा आपले सरकार केंद्रात स्थापन करण्यासाठी आंध्रचे चंद्राबाबू नायडू आणि बिहारचे नितीश कुमार यांच्या पक्षांचा आधार घ्यावा लागला. मोदी 3 सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात या दोन नेत्यांना म्हणजे त्यांच्या राज्यांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. चंद्रबाबू बिझनेस ओळखतात. त्यांना आंध्र प्रदेशची नवीन राजधानी उभारायची असल्यामुळे त्यांनी सत्ता आणि निधी यात कमी वाटेकरू असणार्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा पर्याय स्वीकारला. नितीश यांनीही पलटी मारत पुन्हा भाजपचा अर्थात एनडीएचा हात पकडला. बिहारला विशेष आर्थिक दर्जाची त्यांची दशकभराची मागणी अद्याप पूर्ण झाली नाही. तरी नितीश पुन्हा भाजपसोबत आले. आता तर नितीश एवढे मवाळ झाले आहेत की ते जाहीरपणे भाजपच्या नेतृत्वाचे पाय धरताना दिसत आहेत. त्यांची ही कृती माध्यमांमध्ये चर्चेचा विषय ठरली असून नितीश असे का करत आहेत याचेही आकलन होताना दिसत नाही. नरेंद्र मोदी यांचे तिसरे सरकार नितीश आणि नायडू यांच्या टेकूवर आहे. लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती आल्यावर मोदी यांच्या विरोधात एकवटलेल्या संपूर्ण विरोधकांच्या इंडिया आघाडीने सरकार स्थापन करता येण्याची शक्यता पडताळून पाहिली होती. ते शक्य नसल्यामुळे ते नितीश किंवा नायडू किंवा दोघांची वाट पाहण्यास थांबायला तयार आहेत. इंडियातील काही घटक पक्षांनी तर मोदी सरकार लवकरच पडेल अशी भाकितेही केली. त्यांच्या दुर्दैवाने त्यांच्या अपेक्षेप्रमाणे अद्याप झाले नसताना नितीश यांनी विरोधकांनाच अस्वस्थ करण्याचा सपाटा लावला. बिहारमध्ये काही दिवसांपूर्वीच चित्रगुप्त मंदिरात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमाला नितीश यांना आमंत्रित करण्यात आले होते. भारतीय जनता पार्टीचे एक नेते आर. के. सिन्हा यांनी मंदिराच्या जिर्णोद्धारासाठी नितीश यांनी केलेल्या कामाची प्रशंसा काय केली, नितीश हे सिन्हा यांच्या पाया पडण्यासाठी पुढे सरसावले. दरभंगा येथे दुसर्या एम्सच्या उद्घाटनासाठी मोदी बिहारला गेले. त्यावेळीही नितीश यांनी मोदींच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला; तथापि, पंतप्रधानांनी त्यांना वेळीच रोखले आणि त्यांचा हात धरला. बिहारचे राज्यपाल, दोन-तीन केंद्रीय मंत्री, राज्यातील डझनभर मंत्री या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि त्या सगळ्यांनी हे पाहिले. नितीश यांनी तेथे 9 मिनिटे भाषण केले आणि त्यात किमान आठ वेळा पंतप्रधानांचे नाव घेतले. उर्वरित सात वेळा त्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले आणि मोदी हे सगळे ऐकून हसत असल्याचे संबंधित कार्यक्रमाच्या व्हिडिओतही दिसते. हा प्रकार भाजपला अथवा भाजप समर्थक वर्गाला सुखावणारा, भावणारा असेलही; मात्र त्यामुळे विरोधकांच्या विशेषत: नितीश यांच्या बाहेर पडण्याची वाट पाहणार्यांची अस्वस्थता वाढवणारा आहे. वास्तविक गळाभेट घेणे, ज्येष्ठांना वाकून नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घेणे ही आपल्याकडे सामान्य बाब आहे. कोणी कोणाच्या पाया पडत असेल तर त्यांच्या चांगल्या संस्कारांची प्रशंसाही होते. पण राजकारणात जसे दिसते तसेच असते का? कोणताही भाव अथवा अपेक्षा नसताना राजकारणात सहसा नमस्कार केला जात नाही असे म्हटले जाते आणि तेही वास्तव आहे. नेत्याविरोधात बंडखोरी करून त्यालाच आपला विठ्ठल म्हणणारे राजकारणीही आपल्याकडे कमी नाहीत. मात्र आपल्या आदराचे सातत्याने जाहीर कार्यक्रमात प्रदर्शन करणार्यांचा साधारण एक पन्नाशी किंवा त्याच्या आतला वयोगट असतो. नितीश त्या वयात बसत नाहीत. त्यांच्या मनात पंतप्रधानांबद्दल आदर असेल ही चांगली बाब आहे. तथापि, आपल्यापेक्षा तुलनेने फार कमी यश मिळालेल्या नेत्याचाही त्यांनी व्यासपीठावर नमस्कार करणे हा चर्चेचा विषय नक्कीच आहे. मोदी यांना जेव्हा पंतप्रधान पदासाठी पहिल्यांदा उमेदवारी जाहीर झाली होती तेव्हा 2013 मध्ये त्यांच्या विरोधात एकच प्रबळ आवाज उठला होता व तो होता नितीश यांचा. त्यानंतर त्यांनी मोदींनी आपल्या राज्यात प्रचाराला येऊ नये असा फतवाच काढला होता व पुढे राष्ट्रीय लोकशाही आघाडीलाच रामराम केला होता. नंतर ते राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस यांच्यासोबत गेले आणि सरकारमध्येही बसले. आताही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते पुन्हा भाजपला येऊन मिळाले आणि काँग्रेस व राजदला त्यांनी तोंडावर पाडले. हाच प्रकार त्यांनी अगोदरही केला होता. आता कुठे जाणार नाही, आता तेजस्वी यादव यांनाच पुढे न्यायचे आहे, अशा गोष्टी त्यांनी भाषणांतूनही केल्या. तरीही पुन्हा भाजपसोबत आले आणि आता त्यांनी नवा नमस्काराचा कार्यक्रम सुरू केला आहे. संख्याबळाच्या दृष्टिकोनातून बोलायचे झाल्यास आज नितीश यांच्या पक्षाची ताकद भाजपपेक्षा कमी आहे. मात्र, नितीशच राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची त्यांची ही पद्धत आहे का, अशी चर्चाही झडताना दिसते आहे. बिहारच्या राजकारणाची समज असणार्या तज्ज्ञांच्या मते, व्यक्ती सातत्याने कृतज्ञतेचा अंक सुरू करत असेल, तर त्यामागे शक्यतो दोनच बाबी असतात. एक तर त्याला कशाचे तरी भय असते किंवा आपल्या पदाच्या सुरक्षेसाठी तो असे करत असतो. किंवा वयोमानामुळेही असे प्रकार घडू शकतात. पण तिसरी शक्यता खरी मानता येत नाही, कारण वयाचाच जर विषय असेल, तर सहा महिन्यांपूर्वीचे नितीश वेगळे होते अन् आताचे वेगळे. सहा महिन्यांत एवढा विनम्र भाव जागा होत नाही.