‘बिग बॉस ओटीटी 3 बंद करा; शिवसेनेच्या ‘या’ महिला आमदाराची मागणी

मुंबई : शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी सोमवारी रिॲलिटी शो “बिग बॉस” चे प्रसारण थांबवण्याची मागणी केली आणि शोच्या अलीकडील भागामध्ये अश्लील मजकूर असल्याचा दावा केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी शिवसेनेच्या प्रवक्त्या असलेल्या मनीषा कायंदे यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन ही मागणी केली.
कायंदे म्हणाल्या की, 18 जुलै रोजी प्रसारित झालेल्या भागामध्ये बिग बॉसच्या बेडरूममध्ये कव्हरखाली कृतिका मलिकसोबतचा एक स्पर्धक अरमान मलिक दिसला होता. या जोडप्याने मानवी नातेसंबंध आणि सामाजिक नियमांच्या सर्व सीमा पायदळी तुडवल्या, अगदी मुलंही शो पाहतात आणि त्याचा त्यांच्यावर परिणाम होतो, असं त्या म्हणाल्या.
हा शो बंद करण्यात यावा आणि शोचे निर्माते आणि तो प्रसारित करणाऱ्या कंपनीच्या सीईओवर सायबर गुन्हे कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, बिग बॉस हा आता फॅमिली शो राहिला नाही. अरमान मलिक आणि कृतिका मलिक यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या, असे त्या म्हणाल्या.





