मुंबई : मराठी मनोरंजन विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय आणि चर्चेत असलेला रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी’ आपल्या सहाव्या पर्वासह प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अभिनेता रितेश देशमुख याच्या दमदार सूत्रसंचालनाखाली हा शो ११ जानेवारी रोजी भव्य दिमाखात सुरू झाला. बिग बॉस मराठी ६ च्या ग्रँड प्रीमियरला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, यंदाच्या पर्वातील स्पर्धकांची अंतिम व अधिकृत यादी समोर आली आहे. यंदा मनोरंजन, राजकारण, सोशल मीडिया, नृत्य, गायन आणि फिटनेस अशा विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे पर्व अधिक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. बिग बॉस मराठी ६ मधील स्पर्धकांची माहिती : दीपाली सय्यद: मराठी मालिका, चित्रपट आणि वेबसीरिजमध्ये दमदार भूमिका साकारणारी दीपाली सय्यद या अनुभवी अभिनेत्री आहेत. अभिनय कौशल्य, आत्मविश्वास आणि ठाम भूमिका यामुळे त्या बिग बॉसच्या घरात एक मजबूत स्पर्धक ठरणार असल्याचे मानले जात आहे. त्या राजकारणातही सक्रिय होत्या. विशाल कोटियन: हिंदी आणि मराठी दूरदर्शनवरील लोकप्रिय अभिनेता विशाल कोटियन याने याआधी बिग बॉस १४ मध्ये सहभाग घेतला होता. ‘अकबर बीरबल’, ‘सीआयडी’, ‘महादेव’, ‘महाभारत’ यांसारख्या मालिकांमधील भूमिकांमुळे तो ओळखला जातो. त्याचा अनुभव शोसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. राकेश बापट: शांत, संयमी आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जाणारे राकेश बापट बिग बॉस ओटीटीमधील सहभागामुळे चर्चेत आले होते. बिग बॉस मराठी ६ मध्ये त्यांची एन्ट्री प्रेक्षकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. राधा मुंबईकर: महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी नृत्यांगना राधा मुंबईकर आपल्या पारंपरिक कला सादरीकरणामुळे ओळखल्या जातात. त्यांच्या नृत्यकलेमुळे बिग बॉसच्या घरात मराठमोळा रंग अधिक गडद होणार आहे. प्रभू शेळके: लहान वयातच सोशल मीडियावर लोकप्रिय झालेला बाल कलाकार प्रभू शेळके आपल्या गोंडस अभिनय आणि निरागसतेमुळे प्रेक्षकांची मने जिंकताना दिसत आहे. त्याची एन्ट्री शोला वेगळीच चव देणारी ठरली आहे. दिव्या शिंदे: राजकीय क्षेत्रातून आलेल्या दिव्या शिंदे या प्रभावी वक्तृत्व आणि नेतृत्वगुणांसाठी ओळखल्या जातात. बिग बॉसच्या घरात त्यांची रणनीती आणि निर्णयक्षमता महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. संकेत पाठक: ‘दोस्तीगीरी’ आणि ‘छत्रीवाला’ यांसारख्या चित्रपटांतून ओळख मिळवलेल्या संकेत पाठकची तरुणाईमध्ये मोठी क्रेझ आहे. त्याचा विनोदी स्वभाव आणि ऊर्जा शोला नवी दिशा देऊ शकते. रोशन भजणकर: फिटनेस इन्फ्लुएंसर रोशन भजणकर आपल्या शिस्तबद्ध जीवनशैलीसाठी प्रसिद्ध आहे. शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक कसोटी या शोमध्ये त्याच्यासाठी मोठे आव्हान ठरणार आहे. सागर कारंडे: ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेला सागर कारंडे हा प्रेक्षकांचा लाडका विनोदी कलाकार आहे. त्याची एन्ट्री ही यंदाच्या पर्वातील सर्वात चर्चेची बाब ठरली आहे. करण सोनवणे: सोशल मीडियावरील लोकप्रिय कंटेंट क्रिएटर करण सोनवणे आपल्या विनोदी व्हिडीओंसाठी ओळखला जातो. त्याचा मिश्किल स्वभाव आणि तत्पर प्रतिक्रिया बिग बॉसच्या घरात मनोरंजनाची लाट आणणार आहेत. रुचिता जमदार: याआधी रिअॅलिटी शोमध्ये झळकलेली रुचिता जमदार आत्मविश्वासपूर्ण आणि धाडसी व्यक्तिमत्त्वाची आहे. स्पर्धात्मक वृत्तीमुळे ती लक्षवेधी स्पर्धक ठरणार आहे. अनुश्री माने: सोशल मीडिया इन्फ्लुएंसर असलेल्या अनुश्री माने आपल्या रिलेटेबल कंटेंटमुळे लोकप्रिय आहे. छोट्या पडद्यावर तिची ही नवी इनिंग उत्सुकता वाढवणारी आहे. प्राजक्ता शुकरे: ‘इंडियन आयडॉल’च्या पहिल्या पर्वातून लोकप्रिय झालेली गायिका प्राजक्ता शुकरे आपल्या दमदार आवाजासाठी ओळखली जाते. संगीत आणि रिअॅलिटी शोचा अनुभव तिला फायदेशीर ठरू शकतो. सोनाली राऊत: हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री आणि बिग बॉस ८ मधील स्पर्धक सोनाली राऊत यांची मराठी बिग बॉसमधील एन्ट्री चर्चेचा विषय ठरली आहे. तिचा बोल्ड स्वभाव शोमध्ये रंगत वाढवणार आहे. यांसह ओमकार राऊत, सचिन कुमावत, यांचाही यामध्ये समावेश आहे.