Shrivardhan Assembly Election 2024 | राज्यातील विधानसभा निवडणुकीचा पहिला निकाल समोर आला आहे. त्यानुसार अजित पवार गटाच्या अदिती तटकरेंचा विजय झाला आहे. रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या अदिती तटकरे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अनिल नवगणे यांचा पराभव केला आहे. याशिवाय राजेंद्र ठाकूर हे देखील अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात असल्याने येथे मोठी चूरस होती. अखेर सर्वांवर मात करत आदिती तटकरे यांनी श्रीवर्धन विधानसभा मतदार संघातून विजय मिळवला आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांच्या अदिती तटकरे ह्या कन्या आहेत. 2019 मध्येही श्रीवर्धनमधील तिकिटावर अदिती तटकरे निवडून आल्या होत्या. राष्ट्रवादी पक्षात झालेल्या फुटीनंतर सुनील तटकरे आणि अदिती तटकरे यांनी अजित पवार यांना साथ दिली होती. अदिती तटकरे यांनी ही निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावला होता. अखेर त्यास आता यश मिळाले आहे. दरम्यान, 2019 च्या निवडणुकीत आदिती तटकरे यांनी शिवसेनेचे उमेदवार विनोद घोसाळकर यांचा तब्बल 29 हजार 621 मतांनी पराभव केला होता. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही सरकारमध्ये आदिती यांना मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती. 2024 मध्ये अदिती यांच्या समोर अनिल नवगणे यांचं आव्हान होते. लोकसभेत सुनील तटकरे यांचा विजय लोकसभेला अजित पवारांच्या राष्ट्रवादी उमेदवार सुनील तटकरे यांनी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनंत गीते यांचा पराभव केला होता. श्रीवर्धन मतदारसंघातमध्ये 29 हजार 872 मतांचेच मताधिक्य सुनील तटकरेंना मिळाले होते.