अक्षता म्हात्रे हत्या प्रकरणात मोठी अपडेट; नवऱ्यासह सासू सासऱ्यांना अटक

वाशी : शिळफाटा येथील डोंगरात तीन पुजाऱ्यांनी विवाहित महिला अक्षता म्हात्रे हिच्यावर अत्याचार करून तिची हत्या केली होती. मंदिरातील पुजारी असलेल्या तीन आरोपींनी तिला चहामधून गुंगीचे औषध देऊन हे कृत्य केले होते. याप्रकरणी मूळच्या यूपीच्या असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे तसेच या प्रकरणात विवाहित महिलेचा छळ केल्याप्रकरणी तिच्या सासरच्या लोकांनादेखील अटक करण्यात आली आहे.
काय घडले होते नेमके?
कोपरखैरणे येथील माहेर आणि सीबीडी येथील सासर असलेल्या अक्षताची शिळफाटा मंदिरातील पुजाऱ्यांनी हत्या केल्याची धक्कादायक प्रकार घडला होता. 6 जुलै रोजी सीबीडीतून घर सोडून गेलेल्या महिलेची 10 जुलै रोजी शिळफाटा येथे हत्या करण्यात आली. घरामध्ये भांडण झाल्यानंतर शिळफाटा येथील डोंगरात असलेल्या मंदिरात जाऊन ही विवाहित तरूणी बसली होती. बराच वेळ मंदिरात बसलेल्या तरूणीला एकटी पाहून मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी तिला चहामधून गुंगीचे औषध दिले. यानंतर त्या तिघांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. यानंतर अक्षता शुद्धीवर आल्यानंतर आपले बिंग फुटेल या भीतीपोटी तिघांनी विवाहित महिलेची गळा दाबून हत्या केली आणि बॅाडी डोंगरात टाकली. त्यानंतर चार दिवसापासून मिसिंग असलेल्या या महिलेची हत्या झाल्याचे समोर आले.
सासरच्या लोकांना अटक
सासरी छळ केल्यानेच अक्षता घर सोडून गेली होती. त्यामुळेच हा प्रसंग तिच्यावर ओढवला असल्याने तिच्या घरचेही जबाबदार असल्याने नवरा, सासू, सासरे यांना पोलिसांनी अटक केली आहे. मृत अक्षताला न्याय मिळावा, केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी रविवारी नवी मुंबईकरांनी कोपरखेरणे ते वाशी असा भव्य मोर्चा काढला होता.





