प्रभात वृत्तसेवा मंचर – मंचर नगरपंचायत निवडणुकीत दिवसेंदिवस चुरस वाढत चालली असून विविध पक्षांचे उमेदवार रिंगणात उभे असून प्रत्येकाचा जोरदार प्रचार सुरू आहे. मंचर नगरपंचायत मध्ये सर्वांचे लक्ष लागून असलेल्या नगराध्यक्ष पदाच्या अपक्ष उमेदवार प्राची आकाश थोरात यांना प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने पाठिंबा दर्शवण्यात आल्याची घोषणा आंबेगाव तालुका अध्यक्ष जितेंद्र भालेराव यांनी केली आहे. त्यामुळे प्राची थोरात यांचे पारडे अधिक जड झाल्याचे बोलले जात आहे.दिव्यांग बांधव, विधवा महिला, कष्टकरी, शेतकरी गोरगरीब जनतेसाठी काम करणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने प्राची आकाश थोरात यांना जाहीर पाठिंबा दर्शविण्यात आला. याची घोषणा आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष जितेंद्र भालेराव यांनी केली. यावेळी ते म्हणाले की, संजय थोरात गेल्या अनेक वर्षापासून समाजकार्याचे काम करत असून त्यांच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक दिव्यांग बांधव, गरजू महिला, विधवा महिला शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळाला आहे. समाजातील तळागाळातील जनतेसाठी लोकांसाठी ते काम करतात. त्यामुळे यावेळी आम्ही कुठल्याही पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा न देता अपक्ष उमेदवार प्राची थोरात यांना पाठिंबा दिला आहे. तालुक्यात आमचा पक्ष खूप छोटा आहे,असे बोलले जाते. मात्र, मंचर शहरात आमचे दीड ते दोन हजार दिव्यांग बांधव मतदार आहेत. त्यांचे मतदार हे प्राची थोरात यांना जास्तीत जास्त कशा प्रकारे होईल. यावर आम्ही भर देणार असून सर्व दिव्यांग बांधव, विधवा महिला शेतकरी बांधव व पक्षाचे नेते बच्चुभाऊ कडू यांना मानणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्राची थोरात यांना साथ द्यावी व त्यांच्या ऑटो रिक्षा चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करावे.असे आवाहन जितेंद्र भालेराव यांनी केले.