हैदराबाद : तेलंगणातील भारत राष्ट्र समितीच्या (बीआरएस) 6 विधानपरिषदेच्या आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भारत राष्ट्र समितीचे प्रमुख आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का बसला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या उपस्थितीत या सहा आमदारांनी पक्षप्रवेश केला आहे. गेल्या वर्षी तेलंगणामध्ये विधानसभेची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत के.चंद्रशेखर राव यांच्या बीआरएसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते.
तेलंगणातील विधानसभेच्या निवडणुकीनंतर के. चंद्रशेखर राव यांना धक्यावर धक्के बसत आहेत. आता बीआरएसमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या आमदारांमध्ये दंडे विठ्ठल, भानू प्रसाद राव, एमएस प्रभाकर, बसवाराजू सरैया, बोग्गारापू दयानाद आणि येगे मल्लेशम यांचा समावेश आहे. या आमदारांच्या काँग्रेसमधील पक्ष प्रवेशावेळी काँग्रेसच्या प्रभारी दीपा दास मुंशी यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
दरम्यान, तेलंगणा विधानपरिषदेत बीआरएसचे 25 सदस्य आहेत. मात्र, बीआरएसच्या विधानपरिषदेतील ६ आमदारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे काँग्रेसची ताकद वाढली आहे. विधानपरिषदेतील काँग्रेसच्या आमदारांची संख्या चारवरून आता दहावर पोहचली आहे. माजी मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव यांचे विश्वासू समजले जाणारे केशव राव यांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.