नवी दिल्ली – मजबूत कॉंग्रेस हा विरोधक एकजुटीसाठी महत्वाचा स्तंभ ठरेल, अशी भूमिका पक्षाचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी सोमवारी मांडली. कॉंग्रेसच्या भारत जोडो यात्रेचा उद्देश विरोधकांची एकजूट नाही. स्वत:ला मजबूत करण्यासाठी पक्षाने ती यात्रा हाती घेतली आहे, या भूमिकेचाही त्यांनी पुनरूच्चार केला. कॉंग्रेस मजबूत असेल तरच विरोधकांचे ऐक्य शक्य होईल. विरोधकांचे ऐक्य म्हणजे कॉंग्रेस पक्ष दुबळा होणे नव्हे. कॉंग्रेस स्वत:ला दुबळा होऊ देणार नाही याची जाणीव मित्रपक्षांनीही ठेवावी, असे रमेश येथे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले. भारत जोडो यात्रेने कॉंग्रेस संघटनेत नवे चैतन्य निर्माण केले आहे. यात्रेला जनतेचा लक्षणीय प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. यात्रेमुळे विरोधक ऐक्य घडले तर ती चांगलीच बाब आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. यात्रेमुळे नवसंजीवनी मिळण्याचा विश्वास कॉंग्रेसला वाटत आहे. पुढील काही महिन्यांत विविध राज्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निवडणुकांवर कॉंग्रेस यात्रेचा परिणाम होणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.