आंबा उत्पादकांना मोठा दिलासा

फळपीक विमा योजनेत आंब्यासाठी नव्या निकषाचा समावेश
पुणे – पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारीत आंब्याच्या नुकसानीत नव्याने एका निकषाचा समावेश करण्यात आला आहे. सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आंब्याचे झालेले नुकसान आता भरपाईकरिता ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे राज्यातील विशेषत: कोकणातील आंबा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आतापर्यंत आंबा पिकासाठी नुकसान भरपाई देताना किमान व कमाल हवामान, अवेळी पाऊस व गारपीट या निकषांचा विचार केला जात आहे. मात्र, नैसर्गिकरित्या वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगात अचानक वाढ होऊन, आंब्याचा मोहोर गळणे, हाताशी आलेले पीक गळून पडणे या बाबींचा नुकसान भरपाईत समावेश केला जात नव्हता. त्यामुळे सोसाट्याने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे होणारे नुकसानदेखील ग्राह्य धरण्याची आंबा उत्पादकांची आग्रही मागणी होती. त्यानुसार याबाबीचा समावेश करण्यात आला आहे.
या योजनेंतर्गत मोसंबी, द्राक्ष, केळी, संत्रा, आंबा व डाळिंब या फळपिकांचा समावेश करण्यात आला आहे. जिल्ह्यात अधिसूचित तालुक्यांत महसूल मंडळ हा घटक धरून योजना राबविण्यात येणार आहे. मोसंबी पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 77 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाची रक्कम 3 हजार 850 रुपये, द्राक्ष पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 3 लाख 8 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी भरावयाची रक्कम 15 हजार 400 रुपये आणि केळी पिकासाठी विमा सरंक्षित रक्कम प्रति हेक्टर 1 लाख 32 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी 6 हजार 600 रुपये इतकी रक्कम भरावयाची आहे. विमा हप्ता भरण्याची मुदत 9 नोव्हेंबरपर्यंत आहे.
संत्रा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 77 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी 3 हजार 850 रुपये भरावयाचे आहेत. रक्कम भरण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. आंबा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 1 लाख 21 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी प्रति हेक्टर 6 हजार 50 रुपये भरावयाचे आहेत. यासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत आहे. डाळिंब पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टर 1 लाख 21 हजार रुपये असून शेतकऱ्यांनी 6 हजार 50 रुपये भरावयाचे आहेत. रक्कम भरण्यासाठी 14 जानेवारी 2020 पर्यंत मुदत आहे.





