खासगी रुग्णालयांतील करोना प्रतिबंधक लसीच्या दरात मोठी कपात

पुणे- करोना प्रतिबंधात्मक लसीचा तिसरा डोस घेण्यास 18 वर्षावरील सर्वांना देण्याच्या एक दिवस आधी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि भारत बायोटेक या उत्पादकांनी कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसीचे दर खासगी रुग्णालयांसाठी 225 रुपयांपर्यंत कमी केले आहेत. सध्या खासगी रुग्णालयांसाठी कोविशिल्डचे दर 600 रुपये तर कोवॅक्सिनचे दर 1200 रुपये होते.
सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी यासंदर्भात ट्विट केले आहे. केंद्र सरकारशी चर्चा केल्यानंतर सीरम इन्स्टिट्यूटला कोविशिल्डची किंमत 600 रुपयांवरून 225 रुपयांपर्यंत कमी करण्यात आल्याचे जाहीर करताना आम्हाला आनंद होत आहे, असे त्या ट्विटमध्ये म्हटले आहे. पुनावाला यांनी बुस्टर डोस सर्व प्रौढांना खुले करण्याच्या केंद्र सरकारच्या कृतीचेही अभिनंदन केले आहे.
भारत बायोटेकच्या वतीने सहव्यवस्थापकीय संचालक सुचित्रा इल्ला म्हणाल्या, खासगी रुग्णालयांसाठी आम्ही कोव्हॅक्सिनची लस प्रतीडोस 1200 रुपयांवरून 225 रुपये इतकी कमी करत आहोत.
भारताने बुस्टर डोससाठी नियमावली प्रसिध्द केली आहे. त्यानुसार पहिले दोन डोस ज्या लसीचे दिले असतील त्याच लसीचा तिसरा डोस देण्यात येईल.





