पोलिसांची मोठी कारवाई ! मुंब्रा येथून दीड कोटींचे एमडी जप्त

ठाणे : मुंब्रा येथील मुंब्रा बाह्यवळण मार्गालगत एमडी हे अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीला ठाणे पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेने अटक असून पोलिसांनी त्याच्याकडून एक कोटी ६९ लाख २६ हजार रुपये किमतीचा साठा जप्त केला. मोहनलाल जोशी उर्फ शर्मा (५५) असे अटकेत असलेल्या व्यक्तीचे नाव असून तो पालघर जिल्ह्यातील वाडा येथील रहिवासी आहे.
त्याने हे अमली पदार्थ कुठून आणले याबाबतचा तपास पोलिसांकडून सरु आहे अशी माहिती सोमवारी ठाणे पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या काही दिवसांपासून ठाणे पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोहीम आखली आहे. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या आदेशानुसार, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेची पथके, अमली पदार्थ विरोधी पथके, पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या आणि सेवन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे.
ठाणे पोलिसांनी मागील दीड वर्षांत सुमारे पाच हजार जणांना अमली पदार्थ सेवन आणि विक्री प्रकरणात अटक केली आहे. तसेच सुमारे ३० कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केले असल्याचे त्यांनी सांगितले.





