Mayor’s Reservation : मोठी बातमी! २९ महापालिकांच्या महापौरांचे आरक्षण ‘या’ दिवशी होणार जाहीर

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर शहराचा प्रथम नागरिक अर्थात महापौर पदाची आरक्षण सोडतबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे.
गुरुवार २२ जानेवारी २०२६ रोजी महापौर पदाची आरक्षणाची अधिकृत सोडत जाहीर करण्यात येणार आहे. याबाबत नगरविकास विभागाच्या पत्राद्वारे ही माहिती समोर आली असून, या पत्रात महापौर पदाची सोडत कुठे होणार याबाबत माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे आता महापौर पदाच्या आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ही सोडत राज्याच्या नगर विकास राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. मंत्रालयातील ६ व्या मजल्यावरील परिषद सभागृहात सकाळी ११.०० वाजल्यापासून या प्रक्रियेला सुरुवात होईल. या सोडतीद्वारे अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागास प्रवर्ग (OBC) आणि महिलांसाठीचे महापौर पद निश्चित केले जाणार आहे.
त्यामुळे आता २२ तारखेच्या दिवसाकडे अनेकांचे लक्ष असून, आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते, यावरच अनेक राजकीय दिग्गजांचे महापौर होण्याचे स्वप्न अवलंबून असणार आहे. या सोडतीसाठी नगर विकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. २२ जानेवारीच्या दुपारपर्यंत राज्यातील २९ महापालिकांमध्ये महापौर पदाच्या आरक्षण सोडतीचे चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राज्यातील २९ महापालिकांमध्ये कसे आरक्षण पडणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





