Akola News: अकोल्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. अकोला महापालिकेतील शिवसेना शिंदे पक्षाच्या गटनेते सागर भारुका यांना पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर येथील स्थानिक राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाजपचे स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. यानंतर शिंदेसेनेचे पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. या घटनेवरून शिंदेसेना आणि भाजपमधील अंतर्गत वादाची चर्चा रंगली आहे. नेमकं प्रकरण काय? (Akola News) बुधवारी अकोला महापालिकेत भाजप आणि शिंदेसेनेत राडा झाला होता.शिंदेचे गटनेते सागर भारूक यांनी स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांना शिवीगाळ केली होती.तसेच ते त्यांच्या अंगावर धावून गेले होते, असा आरोप आहे. या घटनेमुळे महापालिकेत गोंधळ उडाला होता.या वादानंतर विजय अग्रवाल यांनी सिटी कोतवाली पोलिसात सागर भारुका यांच्याविरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई करत सागर भारूका यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. Akola News : मोठी बातमी! शिंदेसेनेच्या नेत्याला अटक; नेमकं प्रकरण काय? या घटनेनंतर सभापती विजय अग्रवाल यांनी सागर भारुका यांना 15 दिवसांसाठी निलंबित करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे दोन्ही गटांमधील वाद आणखी चिघळला. दरम्यान, भाजपचे गटनेते पवन महल्ले आणि पोलिसांनी हस्तक्षेप करून संभाव्य हाणामारी टाळली होती. मात्र, या प्रकरणाचा पडसाद बुधवारी पुन्हा उमटला. निलंबनाच्या पार्श्वभूमीवर संतप्त झालेल्या सागर भारुका यांनी विजय अग्रवाल यांच्यावर धाव घेतल्याचा प्रकार घडला. त्यावेळी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मंगेश काळे यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी महापालिकेत गोंधळ घातल्याचेही समोर आले. या घटनेनंतर विजय अग्रवाल यांनी सिटी कोतवाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत सागर भारुका यांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, या प्रकरणानंतर शिवसेनेचे पदाधिकारी राजेश साळवे आणि माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांच्यासह कार्यकर्त्यांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली. सागर भारुका यांनीही विजय अग्रवाल यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण घटनेमुळे महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि शिंदे गटाच्या शिवसेनेतील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हेही वाचा : Narendra Modi : लष्करी संघर्षाने समस्या सुटणार नाहीत; पंतप्रधानांकडून शांततापूर्ण तोडगा काढण्याचे आवाहन