Sangli News : मोठी बातमी! आसाममध्ये 55 कोटींचा सोन्याचा मोठा साठा जप्त; सांगलीच्या तरुणाला अटक
Sangli News : त्यामध्ये दोन आयफोन आणि दोन अँड्रॉईड मोबाईलचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची बाजारातील किंमत ५५ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

सांगली : आसाममधील पोलिसांनी सोन्याच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत तब्बल ५५ कोटी रुपयांहून अधिक किमतीचे ३७ किलो २४ कॅरेट सोन्याची बिस्किटे जप्त केली आहेत. या प्रकरणात महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील ३२ वर्षीय अक्षय बनसोडे याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चार मोबाइल फोन आणि १३ ग्रॅम चांदीही जप्त करण्यात आली आहे.
गुवाहाटीतील खारघुली परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी सांगितले की, संशयित व्यक्तीवर काही दिवसांपासून लक्ष ठेवण्यात आले होते. माहितीची खातरजमा झाल्यानंतर विशेष पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. तेव्हा अक्षय बनसोडे हा दोन बॅग घेऊन उभा असल्याचे आढळून आले. त्याची झाडाझडती घेतली असता बॅगमधून ३७ किलो २४ कॅरेट सोन्याची बिस्किटे सापडली.
याशिवाय आरोपीकडून १३ ग्रॅम चांदी आणि चार मोबाइल फोन जप्त करण्यात आले. त्यामध्ये दोन आयफोन आणि दोन अँड्रॉईड मोबाईलचा समावेश आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची बाजारातील किंमत ५५ कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अक्षय बनसोडे गेल्या दोन महिन्यांपासून गुवाहाटीत वास्तव्यास होता. प्राथमिक तपासात यापूर्वीही त्याने सुमारे २० किलो सोन्याची तस्करी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचे आंतरराष्ट्रीय सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटशी काही संबंध आहेत का, याचाही सखोल तपास सुरू आहे.
आसाम राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी सोन्याची जप्ती असल्याचा दावा आसाम पोलिसांनी केला आहे. या कारवाईमुळे सोन्याच्या तस्करीच्या मोठ्या जाळ्याचा पर्दाफाश होण्याची शक्यता असून, तपास यंत्रणा आरोपीच्या आर्थिक व्यवहारांसह त्याच्या इतर साथीदारांचाही शोध घेत आहेत.





