Shiv Sena : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. २ डिसेंबरला पहिल्या टप्प्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी मतदान पार पडणार असून, ३ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे. तर १० नोव्हेंबरपासून निवडणुकीची प्रक्रियेला सुरूवात होणार आहे. यामुळे निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्षांच्या गोठ्यात हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांना आपल्या जास्तीत जास्त उमेदवारांना निवडून आणण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे जागावाटपात रस्खीखेच अटळ आहे. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर दोन शिवसेना अस्तित्वात आल्या. त्यामुळे कोकणातून एक मोठी बातमी समोर आली असून, स्थानिक निवडणुकांसाठी दोन्ही शिवसेना एकत्र येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात मोठी राजकीय उलथापालथ होणार असल्याची जोरदार चर्चा स्थानिक राजकारणात होत आहे. ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेंची शिवसेना कोकणामध्ये एकत्र निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. यासंदर्भात दोन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची कणकवलीत एकत्रित महत्वाची बैठक पार पडली. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचातासाठी राजकीय मैदान तापू लागले आहे. हालचालींना वेग प्राप्त झाला असून भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. यामुळे शिवसेनेने आपली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जर दोन्ही शिवसेनेची युती झालीच तर एक वेगळ चित्र पाहायला मिळेल. कणकवली शहर विकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना एकत्रित निवडणुकीला सामोरे जावू शकतात. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी संदेश पारकर यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्या नावाला शिंदे सेना पाठिंबा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. ही जर प्रत्यक्षात गोष्ट आली तर ही नवी राजकीय नांदी असणार आहे. हेही वाचा : पंतप्रधानांच्या हस्ते ‘वंदे मातरम्’च्या १५० व्या वर्षानिमित्त समारंभाचे उदघाटन ; टपाल तिकिट अन् नाणे प्रकाशित