प्रभात वृत्तसेवा मंचर – श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे प्रस्तावित भीमाशंकर विकास आराखड्याअंतर्गत मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात येणार असून, त्याचाच एक भाग म्हणून मंदिर सभामंडप तसेच दर्शन बारीच्या पायर्यांची दुरुस्ती व मजबुतीकरणाचे काम प्रस्तावित आहे. या कामादरम्यान कोणतीही दुर्घटना होऊ नये तसेच भाविकांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ नये, यासाठी सुमारे तीन महिने मंदिर बंद ठेवण्याच्या हालचाली प्रशासन स्तरावर सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.श्री क्षेत्र भीमाशंकर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत महत्त्वाचे तीर्थक्षेत्र असून देशभरातून दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येथे येतात. आगामी काळात नाशिक येथे होणार्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 2026मध्ये भीमाशंकर येथे भाविकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन मंदिर परिसरात दर्शन रांगा, सभामंडप, सुविधा केंद्रे तसेच इतर पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.या विकासकामांचा भाग म्हणून मंदिर सभामंडप व दर्शन बारीच्या पायर्यांचे काम सुरू करण्यात येणार असून, कामाच्या कालावधीत मंदिर काही काळ पूर्णतः बंद ठेवण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. मात्र, अद्याप मंदिर बंद ठेवण्याबाबत कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.दरम्यान, येत्या आठवड्यात विकासकामांची पाहणी करण्यासाठी विशेष समिती भीमाशंकर येथे दाखल होणार असून, त्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने दिली आहे. दरम्यान, गुरुवार (दि. 25) रोजी ख्रिसमस तसेच त्यानंतर नववर्षाच्या पार्श्वभूमीवर दर्शनाचे नियोजन केलेल्या भाविकांनी शक्य असल्यास लवकर दर्शन घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मंदिर नेमके किती कालावधीसाठी व कोणत्या तारखेपासून बंद राहणार, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून विकासकामांसाठी मंदिर बंद ठेवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकारी म्हणतात… यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या घोडेगाव येथील अधिकार्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, मंदिर बंद ठेवण्याची अधिकृत घोषणा जिल्हाधिकारी करतील. त्यानंतरच प्रत्यक्ष विकासकामांना सुरुवात केली जाईल, अशी माहिती नाव न छापण्याच्या अटीवर त्यांनी दिली.