Abhijeet Dipke : अभिजीत दीपके यांची मोठी घोषणा; ’20 जूनला…’
Abhijeet Dipke : अमेरिकेत पुन्हा जाणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर दीपके यांनी, “मी आता भारत सोडणार नाही. यापुढे भारतातच राहणार आहे,” असे स्पष्टपणे सांगितले.

Abhijeet Dipke : सरन्यायाधिशांनी बेरोजगार तरूणांना काॅकरोज म्हटल्याने आणि नंतर नीट पेपरफुटी प्रकरणावरून चर्चेत आलेल्या कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी)चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली आहे.
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही, तर २० जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर मोठे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिला.
दीपके यांनी सांगितले की, ६ जून रोजी जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनाला विद्यार्थी आणि तरुणांचा मोठा प्रतिसाद मिळाला. आता या आंदोलनाचा विस्तार देशभर केला जाणार असून, पुण्यापासून त्याची सुरुवात होईल. त्यानंतर लखनऊ, बेंगळुरूसह विविध शहरांमध्ये आंदोलन करण्यात येणार आहे.
“लोग कहते हैं आंदोलन, धरना प्रदर्शन और जुलूस निकालने से क्या होता है ?
इससे यह सिद्ध होता है कि हम जीवित हैं !”सरकार के लिए हम हो सकते हैं कीड़े मकौड़े, लेकिन हम जीवित है और अपने हकों की लड़ाई लड़ने के लिए सक्षम है #cjpprotest pic.twitter.com/pDfenVCHFy
— Cockroach is Back (@Cockroachisback) June 6, 2026
पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात आंदोलनासाठी परवानगी मिळाल्याचा दावा केला. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास २० जूनला पुन्हा दिल्लीतील जंतर-मंतरवर मोठा मोर्चा काढला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
‘हा केवळ परीक्षेचा नाही, विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न’
“हा फक्त एका परीक्षेचा मुद्दा नाही. देशातील कोट्यवधी विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आणि शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न आहे. त्यामुळे हे आंदोलन राष्ट्रीय स्तरावर नेले जाणार आहे,” असे दीपके यांनी सांगितले.
पालकांना भावनिक आवाहन –
यावेळी त्यांनी देशभरातील पालकांनाही आवाहन केले. “विद्यार्थ्यांना त्यांचे प्रश्न मांडण्यापासून रोखू नका. माझी आई आजही माझ्या सुरक्षेबाबत चिंतेत असते. मला अटक होईल किंवा माझ्यावर हल्ला होईल, अशी तिला भीती वाटते. मात्र, अन्यायाविरोधात कुणीतरी आवाज उठवायलाच हवा,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, “एक व्यक्ती बोलली तर तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ शकतो. पण लाखो विद्यार्थी एकत्र आले, तर त्यांचा आवाज दाबणे कोणालाही शक्य होणार नाही.”
‘जेलमध्ये जाण्याचीही तयारी’ –
आंदोलनामुळे तुरुंगात जावे लागले तरी त्याची तयारी असल्याचे दीपके यांनी स्पष्ट केले. “विद्यार्थ्यांनी भीती बाळगू नये. पालकांनीही मुलांना प्रश्न विचारण्यापासून किंवा मत मांडण्यापासून रोखू नये. त्यांची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे,” असे ते म्हणाले.
अमेरिकेत पुन्हा जाणार का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यानंतर दीपके यांनी, “मी आता भारत सोडणार नाही. यापुढे भारतातच राहणार आहे,” असे स्पष्टपणे सांगितले.





