मुंबई – राज्यात शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर काही दिवसांपासून शांत असलेल्या भाजपच्या गोटात आता सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारी निवासस्थान असलेल्या सागर बंगल्यावर आज एक बैठक पार पडली. या बैठकीत राज्यात सुरू असलेल्या घडामोडींवर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
या बैठकीला भाजपाचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, सुधिर मुनगंटीवार यांच्यासह अनेक भाजपाच्या प्रमुख नेते उपस्थित होते. त्यामुळे आता या बैठकीत काय चर्चा झाली आणि सध्याच्या परिस्थितीबाबत काय निर्णय घेतले जातात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला जात आहेत. आजही फडणवीस हे दिल्लीला जाणार असल्याची माहिती मिळते. फडणवीस यांची या आठवड्यातील ही चौथी दिल्ली वारी असणार आहे.